खून, जीवघेणे हल्ले,अपहरण, मारामारीच्या घटनांनी परळीकर भयभीत वाढत्या गुन्हेगारीला आळा कोण घालणार ? गुंडाची धिंड काढण्याची गरज


खून, जीवघेणे हल्ले,अपहरण, मारामारीच्या घटनांनी परळीकर  भयभीत 


वाढत्या गुन्हेगारीला आळा कोण घालणार ? गुंडाची धिंड काढण्याची गरज 


​परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
     परळी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कमालीचे डोके वर काढले असून, पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत दोन निर्घृण खून आणि अनेक जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून वाढत्या गुन्हेगारीला आळा कोण घालणार असा संतप्त  सवाल नागरिकांतून व्यक्त होत असुन दहशत निर्माण करणा-या गुंडांची पोलिसांनी धिंड काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
     ​  ​गेल्या दोन आठवड्यांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची मालिका पाहता गुन्हेगारांना पोलिसांचा कसलीच भिती राहिली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.शहरात कारभारी आंधळे आणि अफजल उर्फ तौफिक खान या दोघांचा निर्घृण खून करण्यात आला. या दुहेरी हत्याकांळामुळे परळीत प्रचंड खळबळ उडाली आहे.तर ​शिवाजी शिंदे व अतुल जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत.गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, शिवाजी शिंदे आणि अतुल जाधव यांच्यावर अत्यंत क्रूरपणे जीवघेणे हल्ले करण्यात आले. या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
​खाजगी सावकाराची दहशत; अनिल पत्की यांना मारहाण: शहरात बेकायदेशीर खाजगी सावकारीने देखील पाय पसरले असून, सावकाराच्या जाचातून अनिल पत्की यांच्यावर जीवघेणी मारहाण करण्यात आली. या घटनेने व्यापारी आणि नोकरदार वर्गात भीती पसरली आहे.
​    ​   भरचौकात आणि दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे किरकोळ व मोठ्या हाणामारीच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी टवाळखोरांचा आणि भाईगिरी करणाऱ्या टोळ्यांचा हैदोस वाढला आहे, मात्र पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.
   कारभारी आंधळे आणि तौफिक खान यांच्या हत्येनंतर परळीकरांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यातच शिवाजी शिंदे, अतुल जाधव आणि अनिल पत्की यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमुळे व्यापारी आणि सामान्य नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. पोलिसांची गस्त नावापुरतीच उरली आहे. ​परळीतील या वाढत्या गुन्हेगारी आलेखावर आतातरी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अधीक्षक कठोर पावले उचलणार का? की आणखी एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहिली जाणार? असा संतप्त सवाल परळीची जनता करत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने