मनुस्मृतीने नाकारलेले हक्क संविधानाने महिलांना बहाल केले - वैशाली डोळस

मनुस्मृतीने  नाकारलेले हक्क  संविधानाने महिलांना बहाल केले -  वैशाली डोळस 


परळी प्रतिनिधी.     धर्मव्यवस्थेच्या नावाखाली महिलांचे जे हक्क मनुस्मृतींने नाकारले होते ते हक्क आणि अधिकार देशातील तमाम महिलांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून  बहाल केले असे प्रतिपादन एडवोकेट वैशाली डोळस यांनी केले. त्या विश्वभूषण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी बोलत होत्या.
   शहरातील रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मैदानात काल रात्री 8 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील अडवोकेट वैशाली डोळस यांचे मनुस्मृतीवर आधारित हिंदू राष्ट्र आम्हाला मान्य नाही या विषयावर रात्री 8 वाजता व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिताताई विलास रोडे या होत्या. तर  विशाखाताई घाडगे, रंजनाताई मस्के, खंडागळे ताई आदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
    यावेळी आपल्या व्याख्यानात अडवोकेट वैशाली डोळस यांनी भारतीय महिलांना मनुस्मृतीने कसे जखडून ठेवले होते, त्यांच्या स्वातंत्र्यावर कशी गदा आणली होती हे सांगितले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे शैक्षणिक कार्य पूर्ण करून संविधानाच्या माध्यमातून महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. एवढेच नाही तर जगातील अनेक देशांना मतदानासाठी आंदोलने करावे लागले परंतु बाबासाहेबांनी देशाला संविधान देतानाच महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केल्याचे सांगितले.
    हिंदू कोड बिलासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला असा राजीनामा आजच्या पंतप्रधानांनी महिला बिलासाठी द्यावा असे आवाहनही केले. अध्यक्षीय भाषणात अनिताताई रोडे यांनी बाबासाहेबांची जयंती ही नाचूनही साजरी झाली पाहिजे आणि वाचुनही असे सांगितले.यावेळी विशाखाताई घाडगे, रंजनाताई मस्के यांनीही आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रंजनाताई मस्के यांनी तर आभारप्रदर्शन खंडागळे ताई यांनी केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कार्यक्रम महिलांशी पार पाडला.कार्यक्रमास शहरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने