बाबासाहेबांनी देशातील पाणी समाजाच्या मालकीचे केले - उत्तम कांबळे

बाबासाहेबांनी देशातील पाणी समाजाच्या मालकीचे केले - उत्तम कांबळे

परळी प्रतिनिधी.     या देशातील व्यवस्थेने ज्याला पाण्याला स्पर्श करू दिला जात नव्हता अशा अस्पृश्य समाजात जन्मलेले महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे जलमंत्री झाले व भारताच्या पाण्याचे नियोजन केले . एवढेच नाही तर बाबासाहेबांनी देशातील पाणीच समाजाच्या मालकीचे केले असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, साहित्यिक, विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.ते परळी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श भीम जयंती महोत्सवात व्याख्यानप्रसंगी  बोलत होते.
    रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे हे होते.यावेळी पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, 1942 मध्ये व्हाईसरॉय मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री झाले.मजूर मंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांनी या देशातील कामगारांची पिळवणूक थांबवली. बारा ते सोळा घंटे काम करणाऱ्या मजुरांच्या कामाचे तास बाबासाहेबांनी 8  तासावर आणले .महिला व पुरुष कामगारांना समान वेतन, महिलांना प्रसूती रजा, खाण कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना कामाच्या जागीच कायमचे सुविधा आदी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय बाबासाहेबांनी घेतले. मजूर मंत्री असतानाच त्यांच्याकडे जल मंत्री पदाचाही कार्यभार होता.पाण्यासाठी सत्याग्रह कराव्या लागणाऱ्या बाबासाहेबांनी भारताच्या पाण्याचे नियोजन केले.
     फुले, शाहू, आंबेडकर ही परंपरा आहे आणि ती परंपरा बुध्दापासून सुरू होते.आपले नेते फुले शाहू आंबेडकरांचे दिवसभर नाव घेतात पण काम मात्र विरोधात करतात.महात्मा फुले यांनी दुःखाचे मुळ मांडले.छत्रपती शाहु महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी शपथ घेतली.असा प्रजेसाठी शपथ घेणारा जगातील पहिला राजा होता असे ते म्हणाले. आपल्या चौफेर व्याख्यानात उत्तम कांबळे यांनी बाबासाहेब यांच्या जीवनावर संपूर्ण प्रकाश टाकला.भारत देश माणसाच्या कर्तृत्व आणि ज्ञानावर चालत नव्हता. पण बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधार युगाचा अंत आणि उजेडाची सुरवात होती.देव आपल्यात क्रांती घडवणार नाही तर शिक्षण आणि राजकारण अतिशय महत्त्वाचे आहे असे बाबासाहेबांना वाटायचे.1937 च्या निवडणुकीत बाबासाहेबांच्या पक्षाला प्रचंड यश मिळाले. पण जगातील सर्वात विद्वान असणाऱ्या बाबासाहेबांना या देशातील जनतेने मात्र 1952 आणि 54 च्या निवडणुकीत पराभव केले. हा पराभव म्हणजे भारताला नवी दिशा देणाऱ्या, नवा विचार देणाऱ्या ,देशात सामाजिक समता प्रस्थापित करणाऱ्या महान अशा विचारवंताचा पराभव होता असेही उत्तम कांबळे यांनी सांगितले.
     अध्यक्ष समारोप करताना प्रा. प्रदीप रोडे यांनी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम घेऊन बाबासाहेबांना अपेक्षित जयंती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सिद्धार्थ जगतकर यांनी केले. याच कार्यक्रमात उत्तम कांबळे यांच्या हस्ते 18 तास अभ्यास उपक्रमात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, पुरुष, आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने