डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबईचे प्रा.स्नेहंकित सारंग प्रथम,गंगापूरचे डॉ. गुंजाळ द्वितीय तर सांगलीचे विलास खरात तृतीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

 मुंबईचे प्रा.स्नेहंकित सारंग प्रथम,गंगापूरचे डॉ. गुंजाळ द्वितीय  तर सांगलीचे विलास खरात तृतीय 





परळी (प्रतिनिधी).   महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त दैनिक सम्राट व परळी बुलेटिन व  विजयकुमार गंडले प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेस  स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. निबंध स्पर्धेत नवी मुंबईचे प्रा.स्नेंकीत सारंग प्रथम तर गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.अमित गुंजाळ यांचा द्वितीय तर आटपाडी, जिल्हा सांगली येथील विलास खरात यांचा तृतीय क्रमांक आला आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येईल असे मुख्य संयोजक रानबा गायकवाड यांनी सांगितले. 
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची  जयंती ही विचारांची व प्रबोधनाची झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य या देशासाठी महान होते. म्हणून  दैनिक सम्राट व परळी बुलेटींन व विजयकुमार गंडले प्रतिष्ठान यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी राष्ट्रनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महिलांचे उध्दारक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान व धर्म स्वातंत्र्य हे विषय निबंध स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. स्पर्धेसाठी  राज्यभरातून निबंध पाठविण्यात आले होते. 
    या स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी, नवी मुंबई येथील प्रा.स्नेहंकित मुनिश्वर सारंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील डॉ. अमित गुंजाळ यांनी द्वितीय तर आटपाडी, जिल्हा सांगली येथील विलास खरात यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. 
    प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्मृतीशेष माजी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक  विजयकुमार गंडले यांच्या स्मृती प्रित्यर्थ रुपये 2001 व प्रशस्तीपत्र ,स्मृतीचिन्ह द्वितीय पारितोषिक आंबेडकरी चळवळीतील दिवंगत धम्म प्रचारक धम्मानंद गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ 1500  रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र तर तृतीय क्रमांकाचे रुपये 1000 रुपयांचे  पारितोषक स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र विलास ताटे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. राजकुमार  यल्लावाड यांनी केले. लवकरच या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल असे रानबा गायकवाड, प्रसिद्ध साहित्यिक अजयकुमार गंडले, प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे,  कवी,प्रसिध्द  निवेदक बालाजी कांबळे, पत्रकार विकास वाघमारे आदींनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने