परळीत राजकीय नेत्यांना मुस्लिम समाजाचा विसर;
एकही पक्षांकडून रोजा इप्तार पार्टी झाली नाही
परळी प्रतिनिधी. पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी राजकीय नेते आणि प्रशासकीय विभागांकडून इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी परळीतील चित्र काही वेगळेच दिसत आहे. शहरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला मुस्लिम बांधवांच्या इफ्तार पार्टीचा पूर्णपणे विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुस्लिम समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, "मुस्लिम समाज काय फक्त मतदानापुरताच आठवतो का?" असा रोकडा सवाल आता विचारला जात आहे.दरम्यान रमजान ईद उद्या दिनांक 21 मार्च रोजी असुन अद्याप एकाही राजकीय पक्षाने रोजा इप्तार पार्टी आयोजित केली नाही.
प्रशासकीय उदासीनतेवरही प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी परळी पोलीस स्टेशनच्या वतीने अतिशय उत्साहात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील सलोखा वाढण्यास मदत झाली होती. मात्र, यावर्षी पोलिसांनाही या सामाजिक उपक्रमाचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सामाजिक सलोखा जपणाऱ्या अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक पाठ फिरवली की काय, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.
मुस्लिम बांधवांच्या संतप्त भावना
निवडणुकीच्या काळात गल्लीबोळात फिरणारे आणि मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये मोठ्या आश्वासनांची खैरात करणारे नेते आता सणासुदीच्या काळात कुठे गायब आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
केवळ मतांच्या राजकारणासाठी समाजाचा वापर केला जातो, परंतु सण-उत्सवाच्या वेळी समाजाची साधी विचारपूसही केली जात नाही, अशा भावना मुस्लिम बांधवांकडून व्यक्त होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा