परळीकरांनो तुमचा रस्ता कुणी खाल्लाय का?नगरोत्थान 110,नंतर 65 आणि आता 19 कोटी

परळीकरांनो तुमचा रस्ता कुणी खाल्लाय का?
नगरोत्थान 110,नंतर 65 आणि आता 19 कोटी

परळी प्रतिनिधी.         परळी शहर हे महाराष्ट्राच्या नकाशावर अत्यंत महत्त्वाचे शहर आहे.याच परळीच्या विकासासाठी नगरोत्थान सुवर्ण जयंती विकासासाठी 110 कोटी रुपये आले होते.त्यानंतर वाढीव अंदाजे 65 कोटी रुपयांची कामे करण्यात आली.त्यानंतर आता डीपीडीसी 2025 - 26 अंतर्गत नुकतेच 19 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. परळीकरांनो पहिल्या दोन टप्प्यांत शहरातील बहुतांश प्रत्येक गल्लीतील रस्ते आणि नाल्यांचा समावेश होता.त्यामुळे परळीकरांनो तुमचा रस्ता कुणी खाललाय का किंवा तो हरवलाय का याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.
    नगरोत्थान योजनेअंतर्गत भुयारी गटारी व अंतर्गत नाली आणि रस्त्याच्या कामासाठी 110 कोटी रुपये 2016- 17 मध्ये  आले होते. या निधीतून परळीतील बहुतांश वस्तीतील अंतर्गत रस्ते ,अंडरग्राउंड भुयारी गटारी व या गटारीत चेंबर आणि त्या चेंबरला  प्रत्येक वस्तीतील घरांतील  सांडपाणी सोडण्याची व्यवस्था करण्याचे काम लातूर येथील संबंधित गुत्तेदाराला दिले होते .यामध्ये जवळपास परळी शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचा विचार केला तर वीस ते पंचवीस किलोमीटर रस्ते होतील अशा पद्धतीने काम होणार होते.
   परंतु संबंधित गुत्तेदाराने वेळेवर काम न केल्यामुळे   एजन्सीला परळी नगरपालिकेने 1 कोटी रुपयांच्या आसपास  दंडही आकारला होता. त्यानंतरही अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत.एकाही घराचे पाणी भुयारी गटारीतील चेंबरमध्ये जात नाही.रस्त्यात काही ठिकाणी चेंबर उंच तर काही ठिकाणी खोलवर झाल्याने उलट नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात अनेक भागात पावसाचे पाणी व नालीचे पाणी रस्त्यावर साचत असल्याचे दिसून येत होते.शहरातील सर्व सांडपाणी एकत्रित करून ते बरकतनगरच्या पुढे सिमेंट फॅक्टरी जवळ मोठ मोठ्या टाक्या करून तेथे जमा करण्यात येऊन त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. परंतु तेथील टाक्यांचे काम अद्यापही पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.
    नगरोत्थान योजनेअंतर्गत सुरवातीचे 110 कोटी रुपये खर्च होत असतांनाच परत परळी शहरातील रस्ते आणि नाल्यांकरिता वाढीव 65 कोटी रुपये मंजूर करून ते अंबाजोगाई येथील एका एजन्सीला देण्यात आले.या 65 कोटी रुपयांत पहिल्या टप्प्यात ज्या वसत्यातील रस्ते व नाल्या राहिल्या होत्या त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. त्यामुळे दोन्ही टप्प्यांचा विचार केला तर परळी शहरातील सर्व वस्तीतील रस्ते आणि नाल्या होणे अपेक्षित होते.
   आता नुकत्याच 19 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामध्ये नागरी दलितेतर वस्ती, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास योजनेअंतर्गत रस्ते व  महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रस्ते आणि नाल्यांचा समावेश आहे. त्यामुळे परळीकरांनो तुमचा रस्ता यापूर्वी कुणी खाललाय का किंवा तो हरवला तर नाही ना याचा शोध घेण्याची गरज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने