नगरोत्थान योजनेअंतर्गत 110 कोटींची वाट लावणा-या गुत्तेरालाच परत एकदा 19 कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर
टेंडर रद्द करण्याची पत्रकार संघाची मागणी अन्यथा 16 रोजी अमरण उपोषण
कामे झालेल्या ठिकाणी टाकली पुन्हा कामे
परळी (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ शहरात यापूर्वी नगरोत्थान सुवर्ण जयंती शहरी विकास योजना अंतर्गत 110 कोटी रुपयांची अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे करणा- या लातूर येथील श्रीनाथ इंजिनियर यांना परत एकदा परळी नगर परिषदेने डी.पी.डी.सी.20250-2026 अंतर्गत 19 कोटी रुपयांची विविध विकास कामांचे दिलेले टेंडर त्वरित रदद करावे अन्यथा 16 मार्च रोजी परळी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक 11 रोजी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीनाथ इंजिनियर लातूर यांनी यापूर्वी नगरोत्थान योजनेअंतर्गत असलेली 110 कोटी रुपयांची कामे पूर्ण केलेली नाहीत
शहरातील भुयारी गटाराचे चेंबर अनेक ठिकाणी रस्त्यावर उंच तर काही ठिकाणी खोल असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक नागरिकांना अपघातात गंभीर दुखापती झाल्या आहेत.विविध पक्ष व संघटना आणि नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत.परळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आणि बांधकाम सभापतींनी शहरात यापुर्वीच झालेल्या कामाच्या ठिकाणी पुन्हा कामे टाकण्याचा घाट घातला व दि.११ मार्च रोजी १९ कोटी रुपयांच्या या कामांचे उद्घाटन करण्यात आले.सदरील कामे ही परळी शहराचे वाटोळे करणाऱ्या लातुरच्या श्रीनाथ इंजिनियर गुत्तेदारास देण्यात येवुन शासनाचा निधी हडप करण्याचा डाव उघडा पडला आहे.
परळी नगरपालिकेची निवडणूक होवुन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असुन या पांच वार्षिक मध्ये परळी शहराचा विकास व्हावा या उद्देशाने राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे,पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी १७ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.याबरोबरच धनंजय मुंडे यांच्या आमदार फंडातील अशा एकुण १९ कोटी रुपयांमध्ये नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी,बांधकाम सभापती पवन मुंडे व काही सभापतींनी शहरातील कामांचे नियोजन करत ज्या ठिकाणी पुर्वीच रस्ते झालेले आहेत अशा अनेक ठिकाणी निधी टाकुण फक्त निधी लाटण्यासाठी उद्घाटनाचा घाट घातला गेला आहे.नगरपालिकेच्या अध्यक्षा आणि काही पदाधिकार्यांचे हे मनसुबे बहुतांश नगरसेवकांना पटले नसल्याने नाराजी व्यक्त करत उद्घाटन कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.या १९ कोटी रुपयांमध्ये परळी शहरातील महात्मा बसवेश्वर चौकाजवळ अग्निशामक केंद्र बांधकाम करण्याचे काम दाखवण्यात आले असुन याठिकाणी सध्या कब्रस्थानचे काम सुरु आहे.तसेच पद्मावती गल्ली, सिध्देश्वर नगर भागातील ज्या रस्त्यांच्या कामासाठी निधी टाकलेला आहे त्या ठिकाणी यापुर्वीच रस्ते झालेले आहेत.१९ कोटींची ही कामे म्हणजे केवळ कागदोपत्री पुर्ण करुन निधी गुत्तेदाराच्या घशात घालण्याचा प्रकार होय.
शहर उखडुन टाकणार्या गुत्तेदारास पुन्हा काम
परळी शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या भुयारी गटार योजनेसह इतर कामे असलेल्या लातुर येथील लड्डा या गुत्तेदाराने कामे पुर्ण करण्याऐवजी अर्धे परळी शहर उखडुन टाकुन नागरीकांसाठी समस्या निर्माण करणार्या या गुत्तेदारालाच ही १९ कोटींची कामे देवुन नगरपालिका पदाधिकार्यांनी परळी शहर पुन्हा भकास करण्याचा विडा उचलण्याची चर्चा होत आहे .
२५ नगरसेवकांचा कार्यक्रमावर बहिष्कार
नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आणि बांधकाम सभापती पवन मुंडे यांनी या १९ कोटी रुपयांच्या उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमास केवळ १० ते १२ नगरसेवक आणि त्यांचे पती उपस्थित होते.जवळपास २५ नगरसेवकांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आपल्याच पदाधिकार्याविरोधात नाराजीचा सुर आवळला.
नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनावर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रानबा गायकवाड, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष शेख मुकरम, उपाध्यक्ष बाबा शेख, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा