10 लाखांचे काम दिले तर 9 लाख तरी खर्च करा
मंत्री पंकजाताई मुंडेंचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
अंबाजोगाई प्रतिनिधी. एखाद्या कार्यकर्त्यांस 10 लाखांचे काम दिले तर 9 लाख रुपये तरी खर्च करा त्यात किमान एक लाख रुपये राहतील पण सगळेच हडपण्याचा प्रयत्न करू नका."ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने कष्ट करून पंधरा पैसे करावेत, पण दहाचे शंभर करायला बघणाऱ्यांची व भ्रष्टाचार करणारांची जागा तुरुंगात आहे, हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षांत दाखवून दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे चुकीची कामे घेऊन येऊ नका," अशा कडक शब्दांत भाजप नेत्या व पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला.अंबाजोगाई येथे भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
अंबाजोगाई आणि परळी परिसरातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता ठेवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "मी तुम्हाला दहा लाखांचे पत्र दिले तर त्यात नियमानुसार एक लाख कमवा, पण काम दर्जेदार करा. घराचे मजले कसे चढतात, हे घरच्यांनी आणि बापाने विचारायला हवे. चुकीच्या मार्गाने कमावले तर कारवाई आणि अटक अटळ आहे, हे लक्षात ठेवा."
राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना मुंडे यांनी विश्वासघातकी प्रवृत्तींवर जोरदार टीका केली. "काही लोक आपल्याला सोडून गेलेत, तर काही लोक आपल्याला वापरून दुसऱ्यांशी संधान साधत गडबड करत आहेत. पण जो माझ्यासोबत कारस्थान करतो, तो कुठे असतो? माझ्या हृदयात पाप नाही, त्यामुळे माझ्या पाठीशी देवाचा आशीर्वाद आहे," असे सांगत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
निवडणुकीत पराभव झालेल्या कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले. "राजकारणात जय-पराजय होतच असतो. मी देखील पडले आहे. पण ज्यांनी हे (कारस्थान) केले, ते आज नकाशावरून गायब झाले आहेत. मला काही करावे लागत नाही, निसर्गच योग्य वेळी काय करायचे ते ठरवतो," असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.
या उद्घाटन प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सर्व शक्ती उभी राहते आणि तुम्हीच माझी खरी शक्ती आहात," असे म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

टिप्पणी पोस्ट करा