वढु बुद्रुक येथील पराक्रमी गोविंद गणपत महार यांच्या समाधीवळील विरगळांना शेंदूर फासून दैवीकरण करण्याचा प्रयत्न
वंशज पांडुरंग गायकवाड यांनी केला निषेध ,समाधीच्या विकासाची केली मागणी
परळी ( रानबा गायकवाड) रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारे शूर वीर स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून औरंगजेबाने क्रूरपणे ठार केल्यानंतर त्यांच्या शरीराचे नदीकाठी फेकून दिलेले तुकडे तुकडे गोळा करून भीमा नदीच्या काठावर वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करणारे ,पराक्रमी गोविंद गणपत महार यांचीही समाधी वढु बुद्रुक येथील बौद्ध वस्तीत आहे.याच समाधीजवळ गोविंद गोपाळ उर्फ गोविंद गणपत महार यांच्या समवेत त्याकाळी असणारे काही सहकारी आहेत .त्यांच्या मुर्ती ( विरंगळा) यांना अज्ञात कोणी तरी शेंदूर फासून दैवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेचा गोविंद गोपाळ महार यांचे 13 वे वंशज पांडुरंग उर्फ अशोक गायकवाड यांनी निषेध केला आहे.व कोणीही असे करू नये असे आवाहन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने 11 मार्च 1989 रोजी ऐतिहासिक भीमा कोरेगाव पासून अडीच किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या तीरावर तुळापूर येथे अत्यंत क्रूर आणि निर्दयपणे ठार केले. ही घटना छत्रपती संभाजी राजांचे पराक्रमी मावळे आणि गुप्तहेर असणाऱ्या गोविंद गणपत महार यांना कळली. राणी येसूबाई यांनी त्यांना छत्रपती संभाजी राजांना शोधण्यासाठी त्यांना मोहिमेवर पाठविले होते. छत्रपती संभाजी राजांची औरंगजेबाने तुळापूर येथे हत्या करून वढू बुद्रुक येथील भीमा नदीच्या काठावर शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिल्याचे गोविंद गणपत महार यांना कळाले त्यांनी औरंगजेबाला व त्याच्या सैन्याला सांग पत्ता लागू न देता , आपल्या जीवाची पर्वा न करता वेशांतर करून संभाजी राजांचे तुकडे गोळा केले. आणि वढु बुद्रुक येथील महार वाड्यात त्यांच्या काही सहकार्य समवेत अंत्यविधी केला.
छत्रपती संभाजी राजांचा अंत्यविधी करणारे पराक्रमी गोविंद गोपाळ महार यांचीही समाधी वढु बुद्रुक येथील बौद्ध वस्तीत आहे. 2017 मध्ये वढु बुद्रुक येथे जातीय दंगल झाली होती. त्यानंतर वढु बुद्रुक येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी जवळ तसेच गोविंद गणपत महार यांच्या समाधी जवळ राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दिवस - रात्र तैनात करण्यात आलेले आहेत.
पराक्रमी गोविंद गणपत महार यांच्या समाधी जवळ जवळ बाजूलाच त्यांच्या सहकाऱ्यांच्या छोट्या छोट्या दगडी विरंगळ आहेत. मूर्ती आहेत. या मूर्तींना कोणीतरी शेंदूर फासल्याचे दिसत आहे. याबाबत गोविंद गोपाळ महार यांचे तेरावे वंशज पांडुरंग उर्फ अशोक गायकवाड यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली तेव्हा त्यांनी या घटनेचा निषेध केला व असे कोणीही करू नये असे आवाहन केले. हा ऐतिहासिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे. तसेच राज्य शासनाने शूरवीर पराक्रमी गोविंद गोपाळ उर्फ गोविंद गणपत महार यांच्या समाधीचा विकास करावा असे आवाहन केले. यावेळी कवी विकास चोपडे हेही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा