पत्रकारिता आणि आमचें लिहणे
पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. पत्रकार शासन आणि प्रशासन तसेच जनता यांच्यातील दुवा आहे .पत्रकार म्हणजे अभ्यासू आहे. पत्रकार म्हणजे नागरिकांच्या प्रश्नांची जाण असणार आहे. पत्रकार समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवणारा आहे. पत्रकार हा निर्भिडपणे सत्य मांडणार आहे , पत्रकार हा वास्तव लिहिणार आहे. असे अनेक नानाविध विभुषणे लोक पत्रकारांच्या पाठीमागे लावत असतात. आम्हालाही लोक जेव्हा असे म्हणतात तेव्हा आमची छाती 56 इंचापेक्षा अधिक जास्त फुगते.
लोक पत्रकारांच्या बाबतीत जसा दृष्टिकोन बाळगून असतात तसे आम्ही आज खरेच आहोत का? याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अनेक महापुरुषांनी पत्रकारितेचा वसा समाज सुधारण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी घेतला होता. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न, समाजाच्या वेदना, समाजाचे दुःख ,अन्याय, अत्याचार याला आपल्या धारधार लेखनाच्या माध्यमातून निर्भीडपणे आपल्या वर्तमानपत्रातून मांडले होते. अशा बातम्यांना, अशा लेखांना, अशा वार्तापत्रांना त्या त्याकाळी सत्ताधाऱ्यांना दखल घ्यावीच लागत होती. मग ते इंग्रज असोत की स्वातंत्र्याच्या नंतर आज पर्यंत असणारे सत्ताधारी असोत.
सरकारच्या विरोधात लिखाण केले, सरकारच्या विरोधात जनतेची बाजू घेऊन सत्य मांडले म्हणून अनेक वर्तमानपत्राच्या संपादकांना आणि पत्रकारांना जेलमध्ये जावे लागले आहे. हा इतिहास आहे. अलीकडच्या काळात तर काही पत्रकारावर देशद्रोहांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले गेले.अट्टल गुन्हेगारांना अटक केली जाते तसे रात्री बे रात्री पत्रकारांच्या घरी पोलिसांनी धाडी टाकून कोणतेही कारण नसताना खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून अटक केली. परंतु शेवटी न्यायालयाने दखल घेतली आणि सर्वच पत्रकारांची सुटका केली.
पत्रकारिता ज्यांना सोपी वाटते. पत्रकारिता म्हणजे निव्वळ खिशात कार्ड घेऊन फिरणे आणि जाहिराती गोळा करणे आणि कुठे काही मलिदा मिळेल का? या भावनेने काम करणे, वसुली करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे .पत्रकारिता एक सतीचे वान आहे. पत्रकारिता जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणारा खरा समाजसेवक आहे. लोकांचा आवाज आहे. लोकांचा सारथी आहे. परंतु त्याची पत्रकाराला जाणीव पाहिजे. आज जेव्हा इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाने आधुनिकतेची कास धरली आहे तेव्हा निश्चितच पत्रकारिता गतिमान झालेली दिसते.
पत्रकारिता गतिमान होण्याबरोबरच ती प्रत्यक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या हातात गेली आहे. आज अनेक बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या अगोदर लोकांपर्यंत पोहोचत आहेत. एखादी घटना पत्रकारांना माहीत होण्याअगोदर ती जनतेला माहीत होत आहे. जे काम आम्ही पत्रकारांनी करायला पाहिजे ते खरेच करत आहोत का? आणि खरंच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत आहोत का? आम्ही खरेच शासन आणि प्रशासनाला हादरवून सोडत आहोत का? आणि खरच जनतेच्या प्रश्नावर किती निर्भीडपणे लिहीत आहोत हे तपासण्याचे गरज आहे. पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा समाजात वावरतो तेव्हा लोक आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहत असतात. आम्हाला बरेच काही कळते आणि आम्ही बरेच हुशार असतो असे लोकांची भावना असते.
पत्रकारांच्या विषयी लोकांची जी भावना आहे .ती भावना मात्र आता लोप होताना दिसत आहे .इलेक्ट्रॉनिक मीडियात तर पत्रकारांना केवळ पुढाऱ्यांच्या मागे आपला बुम घेऊन फिरणे एवढेच काम उरले की काय असे दिसते. एका पुढाऱ्याचे मत जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया घेण्यासाठी लगेच दुसऱ्या पुढच्या घरी. त्याची प्रतिक्रिया घेतली की परत पहिल्या पुढाऱ्याच्या घरी नंतर तिसऱ्या पुढाऱ्याच्या घरी असे फक्त राजकारण्यांच्या अवतीभवती इलेक्ट्रॉनिक मीडिया गुंतलेला दिसून येतो. त्यामुळे सर्वसामान्य कष्टकरी ,शेतकरी ,तरुण , बेरोजगारी ,महागाई ,आत्महत्या, साहित्य , संस्कृती,समाजसेवा आदी गंभीर प्रश्नावर क्वचितच बातम्या पाहायला मिळतात.
प्रिंट मीडियात तर एकेकाळी असणाऱ्या साहित्य पुरवण्यात आज अनेक वर्तमानपत्रांनी बंद केलेल्या आहेत .साहित्यिक पूर्वी अनेक मोठमोठ्या वर्तमानपत्रांचे संपादक असायचे. आता संपादक साहित्यिक असावा ,तो लिहिणारा असावा, तो अभ्यासू असावा ,त्याचे वाचन प्रचंड असावे असा काही मापदंड राहिलेला नाही. महाराष्ट्रात नवाकाळ हा संपादकीयेचा बादशहा समजला जायचा. लोक आवर्जून दैनिक नवाकाळचे संपादकीय वाचायचे . सत्ताधारी राजकारणी यांना आरसा दाखवायचे काम अनेक संपादकांनी संपादकीयच्या माध्यमातून केलेले आहे. आजही सुजाण वाचक वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर अगोदर संपादकीय वाचतात.
आज पत्रकारितेत आम्ही लिहिणे विसरलो आहोत असेच दिसत आहे .आज जेव्हा अवतीभवती पत्रकारांना पाहतो तेव्हा अनेकांच्या खिशाला तर पेन दिसत नाही .आता स्मार्ट मोबाइल आले. त्यामुळे पेनाची गरज नाही असे अनेकांना वाटत असेल. आता आपल्या जवळ मोबाईलवर व्हॉइस रेकॉर्डिंग आली त्यामुळे पेनाची गरज नाही. बातम्या लिहिण्याची, लेख लिहिण्याची, वार्तापत्र लिहिण्याची गरज नाही असे अनेकांना वाटत असेल .परंतु बातमीचा आत्मा तेव्हाच खऱ्या अर्थाने बातमीत उतरत असतो जेव्हा तुम्ही एखादी बातमी स्वतः लिहिता. पत्रकाराला आनंद तेव्हाच मिळत असतो जेव्हा तुम्ही एखादा लेख अभ्यासपूर्ण लिहीत असता, एखाद्या संपादकाला आनंद तेव्हाच मिळत असतो जेव्हा तो संपादक अभ्यासपूर्ण संपादकीय लिहीत असतो.
आज वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना लिहावेसे वाटत नाही. त्याचे कारणे अनेक असू शकतात. अनेक पत्रकार मित्रांना वाचनाची गरज आहे असे वाटत नाही. कारण पत्रकारांपर्यंत आता ज्या बातम्या मिळतात त्या बहुतेक बातम्या जास्तीत जास्त राजकीय पुढार्यांकडून, नेत्यांकडून येत असतात. आणि राजकीय नेते मंडळी यांच्याकडे काम करणारा एखादा तरी पत्रकार असतो तोच बातमी तयार करून देतो आणि ती बातमी जशाला तशी छापणे तेवढेच काम आमच्याकडे शिल्लक राहते. आलेल्या बातमीत एक अक्षरही आम्ही कमी जास्त करत नाहीत. किंवा त्यामध्ये एक आहे अक्षराची आम्ही भर घालत नाहीत.
त्यामुळे आज आम्हाला लिहावेसे वाटत नाही.वाचन करावे असे वाटत नाही. आम्ही लिहिणार नसू, वाचणार नसू तर एक अभ्यासू आणि व्यसंगी पत्रकार म्हणून आम्ही कसे घडणार? लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी शासनाच्या प्रशासनाच्या चुकीच्या धोरणावर आसुड ओढण्यासाठी बातमी लिहावीच लागते. लेख लिहावेच लागतात . वार्तापत्र लिहावेच लागते. संपादकीय लिहावेच लागते. कुणी तरी पाठविलेल्या बातम्या एकही अक्षर न बदलता छापण्यात धन्यता मानणे म्हणजे पत्रकारिता नव्हे.आज गुगल असेल किंवा अनेक एआय प्लॅटफॉर्म उपलब्ध असतील त्यावर सारे काही मिळेल पण अशा मिळालेल्या साहित्यामध्ये आपली बुद्धिमत्ता आणि पत्रकारांचे कौशल्य मात्र कधीच नसते.याला कॉपी-पेस्ट म्हटले तरी हरकत नाही. अशा लिहणे कमी होत चाललेल्या पत्रकारितेच्या काळात लिहिणाऱ्या पत्रकारांचे कौतुकही तितकेच महत्त्वाचे आहे. दर्पण दिनाच्या निमित्ताने संपादक आणि पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा.
रानबा गायकवाड
जेष्ठ पत्रकार व साहित्यिक
9420148538

टिप्पणी पोस्ट करा