सिने-थिएटर मॅस्ट्रो: डॉ. अनिलकुमार साळवे*

*सिने-थिएटर मॅस्ट्रो: डॉ. अनिलकुमार साळवे*

कलाक्षेत्राच्या अथांग क्षितिजावर स्वतःचा स्वतंत्र आणि झळाळता ठसा उमटवणे ही साधी गोष्ट नाही. कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे ज्यांना उमजले अशा मोजक्या प्रतिभावंतांमध्ये आमचे  सन्मित्र डॉ. अनिलकुमार साळवे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. जेव्हा शब्दांना धारदार सामाजिक भान असते आणि दृष्टीला जागतिक स्तरावरील कलेचे स्वप्न, तेव्हा डॉ. अनिलकुमार साळवे यांच्यासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आकाराला येतं. नाटककार, कवी, विचारवंत, चित्रपट दिग्दर्शक आणि एक निष्णात मार्गदर्शक अशा विविधांगी भूमिकांतून त्यांनी केवळ मराठी नाट्यसृष्टीच नव्हे, तर चित्रपटसृष्टीलाही आपल्या अष्टपैलू प्रतिभेने समृद्ध केले आहे.

*शैक्षणिक शिदोरी आणि वैचारिक भक्कम पाया*:-
डॉ. अनिलकुमार साळवे यांची शैक्षणिक कारकीर्द ही त्यांच्या कलाप्रवासाइतकीच प्रेरणादायी, खडतर आणि तितकीच प्रभावी आहे. त्यांनी कलेचा केवळ छंद जोपासला नाही, तर तिचा सखोल अभ्यासही केला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)येथून एम. पी. ए. (मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स), एम. ए., नेट  आणि पीएच. डी. अशा सर्वोच्च पदव्या संपादन करून सिद्धांताला प्रयोगाची जोड दिली. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबादच्या) प्रसिद्ध देवगिरी महाविद्यालयात त्यांनी नाट्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ धुरा सांभाळली. एक शिक्षक म्हणून त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भावी पिढीतील अनेक कसलेले कलाकार, तंत्रज्ञ आणि विद्यार्थी घडवले आहेत, जे आज कलाक्षेत्रात विविध स्तरांवर कार्यरत आहेत.

*नाट्यलेखन: शब्दांच्या रसरशीत ठिणग्या*:-
डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्याने केवळ कागदावर अक्षरे उमटवली नाहीत, तर ज्वलंत अनुभवांच्या माध्यमातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या प्रतिभेचा आवाका मोठा असून त्यांच्या खात्यावर आजवर ४१ एकांकिका, ०६ नाटके, अनेक प्रहसन (विनोदी लघुनाट्य) आणि पथनाट्यांचे सशक्त लेखन जमा आहे.   डॉ. साळवे यांच्या एकांकिकांनी महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व मानाच्या स्पर्धांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. 'शापित' (प्रथम पुरस्कार - ललित कला केंद्र, औरंगाबाद), 'गांधीजींचा चष्मा हरवला आहे' (प्रथम पुरस्कार), 'राज्यकर्ता' (युवक महोत्सवात प्रथम), आणि विशेषतः 'ग्लोबल आडगाव' या एकांकिकेने राज्यस्तरीय स्पर्धेत विक्रमी ५२ पुरस्कार पटकावून इतिहास रचला आहे.  त्यांच्या इतर कलाकृतींमध्ये 'अघटित' (द्वितीय पुरस्कार), 'शांतता दंगल चालू आहे' (१८ पुरस्कार), 'रणसंग्राम' (तृतीय पुरस्कार), 'आक्रोश' (प्रथम पुरस्कार), 'अमृता' (तृतीय पुरस्कार) आणि 'स्त्री' (प्रथम पुरस्कार) यांचा समावेश होतो. 'तिच्यासाठी वाट्टेल ते' (२८ पुरस्कार), 'सूरज के बुलंद हौसले...' (२२ पुरस्कार), 'शेख मुहम्मद मराठी माध्यम' यांसारख्या कलाकृतींनी रंगमंच गाजवला आहे. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे, त्यांच्या एकांकिकांचे आजवर अनेक प्रयोग झाले आहेत, जे त्यांच्या लेखणीच्या लोकप्रियतेची साक्ष देतात.गंभीर आणि सामाजिक नाट्य लेखनातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 'अग्निकुंड' (राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार), 'ओयासीस' आणि 'उद्ध्वस्त' (राज्य नाट्य स्पर्धेत द्वितीय) यांसारखी दर्जेदार नाटके त्यांनी सिद्ध केली आहेत. 'वतन के लिये' हे त्यांचे राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर आधारित महत्त्वाचे नाटक आहे. सामाजिक वास्तवावर आणि अस्वस्थ करणाऱ्या विषयावर भाष्य करणाऱ्या 'कथा खैरलांजी' या नाटकाचे व्यावसायिक रंगभूमीवर ७१ यशस्वी प्रयोग झाले असून या नाटकाने समाजमनाला अंतर्मुख केले आहे.विनोदी अंगाने समाजातील विसंगतीवर प्रहार करणारी त्यांची प्रहसने प्रचंड गाजली. यामध्ये 'कुत्र्याची शेपटी', 'कुपोषित राष्ट्राचे उपाशी राजे', 'द गेम ऑफ बीलू व्हेल', 'जोकर' आणि 'उच्च शिक्षणाच्या आईचा घो' या सर्वांनी विद्यापीठीय स्तरावर प्रथम पुरस्कार पटकावले आहेत. 'कब होगी सुबह' या प्रहसनाने २०१६ मध्ये कोल्हापूर येथे राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवून आपली ताकद सिद्ध केली. पथनाट्य चळवळीतून त्यांनी प्रबोधनाचा जागर घातला आहे. डॉ. साळवे यांनी कलेला केवळ दिवाणखान्यात किंवा बंदिस्त नाट्यगृहात ठेवले नाही, तर ती थेट जनतेच्या दारात नेली. सामाजिक प्रबोधनाचे अस्त्र म्हणून त्यांनी पथनाट्याचा अतिशय प्रभावी वापर केला.'आम्ही बंदिस्त पाखरे' (५१२ प्रयोग), 'मृत्यू छाया' (३१२ प्रयोग), 'मुक्या बाहुल्या' (२१० प्रयोग), 'असिफा तू जिंदा है' (१७२ प्रयोग),'आझादी दो'(१२८ प्रयोग), 'हमे आझादी चाहीये' (७५ प्रयोग) आणि 'जोकरांचे राज्य' (५२ प्रयोग) यांसह त्यांनी एकूण ३३०० पथनाट्य प्रयोगांच्या माध्यमातून जनमानसात अन्यायाविरुद्ध आणि सामाजिक मूल्यांच्या जागृतीसाठी क्रांतीचे बीज पेरले आहे.

*चित्रपट आणि लघुपट: सातासमुद्रापार झेप*:-
रंगभूमीवरील यशानंतर डॉ. साळवे यांनी रुपेरी पडद्याच्या तंत्रावरही आपली हुकूमत गाजवली आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांनी मानवी भावनांचे आणि सामाजिक प्रश्नांचे चित्रीकरण केले.
 'ग्लोबल आडगाव (चित्रपट)' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले आहे. उद्योजक मनोज कदम व अमृत मराठे निर्मित आणि डॉ. सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शित या चित्रपटात प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये आणि अनिल नगरकर यांच्यासह जवळपास सहाशे दिग्गज कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आला आहे.
प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगावचे भूमिपुत्र डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित "ग्लोबल आडगाव" या  उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली .पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ),कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,यशवंतराव चव्हाण  चित्रपट महोत्सव,अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,अशा विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा सिनेमा झळकला आहे.
 ' दि थर्ड आय चित्रपट':  फिनिक्स फिल्म प्रोडक्शनचे निर्माता-लेखक  सोमनाथ लहाने निर्मित या सामाजिक आशयाच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही डॉ. साळवे यांनी केले आहे. यात प्रख्यात अभिनेता सुरेश विश्वकर्मा, अनिकेत केळकर, जितेंद्र शिरसाठ उर्फ कुमार जीत, अर्चना चैतन्य साळुंके,प्रेरणा खरात, रोहिणी हाके, अमितसिंग, राज कुंदन, साहेबराव पाटील, डॉ. संजीवनी साळवे, अंश पोलकम आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचे सहपटकथाकार, अभिनेता व असोसिएट दिग्दर्शक म्हणून डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
 *लघुपटांचा जागतिक दबदबा:*- डॉ. अनिलकुमार साळवे यांच्या '१५ ऑगस्ट' या लघुपटाने जागतिक स्तरावर मराठी झेंडा फडकवला. या लघुपटाची अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे निवड झाली आणि लंडन, अमेरिका यांसह जगभरातून या लघुपटास ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तसेच 'शिरमी' लघुपटास १८ पुरस्कार, 'डोंब' ला ४ पुरस्कार मिळाले असून 'कोंदन' या लघुपटाची निवड प्रतिष्ठित राष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झाली आहे. आजही ते नवीन चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनात अविरतपणे व्यस्त आहेत.

*सन्मान आणि पुरस्कारांचा अद्वितीय विक्रम*:-
डॉ.अनिलकुमार साळवे यांची कारकीर्द पुरस्कारांच्या लखलखत्या चांदण्यांनी अलंकृत आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून त्यांना आजवर एकूण २६५ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महत्त्वाचे सन्मान: नाट्यलेखनातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार (२०१७) प्रदान करण्यात आला. याव्यतिरिक्त 'रां. श. दातार पुरस्कार', 'द्रोणाचार्य नाट्यलेखन पुरस्कार', 'जगदीशचंद्र माथुर पुरस्कार', 'समता पुरस्कार', 'समाजभूषण पुरस्कार' आणि 'म. फुले आदर्श शिक्षक पुरस्कार' अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
*लघुपट क्षेत्रातील गौरव:*- '१५ ऑगस्ट' लघुपटासाठी त्यांना दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट लेखन पुरस्कार, व्ही. शांताराम सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार, 'टीच व्ह्यु बेस्ट फिल्म अॅवॉर्ड', 'INSFF बेस्ट फिल्म अॅवॉर्ड' आणि S.S.V. राष्ट्रीय स्तरावरील लेखन, दिग्दर्शन व चित्रपट अशा तिन्ही श्रेणीतील पुरस्कारांचा समावेश आहे.ग्लोबल आडगाव चित्रपटासाठी न्यूलीन लंडनचा 'बेस्ट रायटर अवॉर्ड',अमेरिका न्यू जर्सी 
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लेखक व  उत्कृष्ट चित्रपट सन्मान प्राप्त झाला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्यांनी ५ वेळा सांघिक पारितोषिक आणि ४ वेळा जनरल चॅम्पियनशिप (केंद्रीय युवक महोत्सव) मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे, जी त्यांच्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडवते.

*सहचारिणी डॉ. संजीवनी साळवे यांची सर्जनशील साथ*:-
कोणत्याही मोठ्या यशामागे एक भक्कम साथ असते. डॉ. साळवे यांच्या या देदीप्यमान प्रवासात त्यांची सहचारिणी डॉ. संजीवनी साळवे - दिपके यांची त्यांना अनमोल साथ लाभली आहे. डॉ. संजीवनी स्वतः एक प्रगल्भ अभिनेत्री असून मुंबई विद्यापीठाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सर्जनशील विचारांची आणि सहकार्याची जोड डॉ. साळवे यांच्या कलाप्रवासाला अधिक समृद्ध बनवणारी ठरली आहे.

सर्जनशील लेखक-दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे हे केवळ एक व्यक्ती नसून ती सांस्कृतिक, सामाजिक तसेच कला विश्वातील एक अनमोल रत्न आहे. आपल्या धारदार लेखणीतून अन्यायावर प्रहार करणारे, अभिनयातून संवादांची पेरणी करणारे आणि दिग्दर्शनातून जागतिक दर्जाची मांडणी करणारे ते एक थोर कलावंत आहेत. त्यांच्या कार्याचा आवाका हा लोकल टू ग्लोबल असा पसरलेला आहे. मराठी मातीतील कला सातासमुद्रापार नेणाऱ्या या महान सारथ्याला आणि त्यांच्या 'ग्लोबल आडगाव', 'दि थर्ड आय' आणि आगामी  सर्व प्रकल्पांना रसिक प्रेक्षकांच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा! सिने-थिएटर मॅस्ट्रो: डॉ. अनिलकुमार साळवे यांना #जन्मोत्सव निमित्ताने सम्यक #मंगलकामना! त्यांच्या प्रतिभेचा हा वेल असाच गगनाला भिडत राहो, हीच सदिच्छा.!💐🎂💐
*प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे*
(सिने-नाट्य अभिनेता लेखक दिग्दर्शक)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने