अपक्ष व बंडखोरामुळे प्रस्थापित पक्षांना परळी नगरपरिषद निवडणुकीत बसणार धक्का
परळी प्रतिनिधी. परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे रणधुमाळी सुरू असून नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने उभे असलेले अपक्ष आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये अनेकांनी केलेली बंडखोरी यामुळे प्रस्थापित पक्षांना धक्का बसणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे.
शहरातील अनेक प्रभागातून अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे .नुकतेच काल दिनांक 26 नोव्हेंबर रोजी अपक्षांना चिन्ह वाटप झाल्यानंतर अपक्ष उमेदवारांनी प्रचारात जोर लावला आहे. तसेच आपले चिन्ह प्रत्यक्ष मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न चालू केले आहेत. बॅनर ,ऑटो रिक्षा, कॉर्नर सभा ,सोशल मीडिया यांचा वापर करून अपक्ष उमेदवार त्यांना मिळालेले चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवीत आहेत .सोशल मीडियाच्या माध्यमातून एकाच दिवसात चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.
दुसरीकडे परळी नगर परिषदेत सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट तसेच भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना तसेच माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली गेल्यामुळे अनेक प्रभागातून असे नाराज माजी नगरसेवक आणि अनेक कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.
अनेक प्रभागांमध्ये अशा अपक्ष आणि बंडखोरांची ताकद मोठी आहे .तसेच त्यांची लोकप्रियताही आहे. त्यांनी केलेल्या कामाचा फायदा काही प्रभागातून निश्चितपणे होताना दिसत आहे. त्यामुळे परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोरामुळे प्रस्थापित पक्षांना धक्का बसणार हे स्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा