आत्मविश्वास असेल तर यश हमखास मिळतेच - महादेव किरवले

 आत्मविश्वास असेल तर यश हमखास मिळतेच -  
  महादेव किरवले 


सिरसाळा (प्रतिनिधी): आत्मविश्वास आणि सातत्य व कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतेच असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी केले.ते सिरसाळा येथे नालंदा अभ्यासिका यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
    सिरसाळ्यातील नालंदा अभ्यासिका यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. रामदादा किरवले यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपजिल्हाधिकारी आयु. महादेव किरवले उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना महादेव किरवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, “यश हे अचानक मिळत नाही; ते सातत्य, आत्मविश्वास आणि समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेतून जन्म घेतं,” असा संदेश दिला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचा आराखडा, वेळेचे नियोजन आणि सातत्य या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित केले.
   तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “स्पर्धा परीक्षा ही केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.” स्वाभिमान जपण्यासाठी व चांगला माणूस बनण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे, प्रशासकीय सेवांमधील प्रामाणिकता, जबाबदारी आणि समाजाशी जोडलेले राहण्याचे मूल्य त्यांनी विद्यार्थ्यांपुढे मांडले.
  यावेळी सुखदेव आरसुळे यांनी सादर केलेल्या भीम गीताने सभागृहात भावनिक आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. या गीताद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ऊर्जा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.या प्रसंगी  मंगलताई साहेबराव किरवले,  अच्युत बप्पा किरवले, साहेबराव किरवले, दत्ता घडवे, शिंदे मामा, संतोष किरवले, संभाजी आरसुळे, निवृत्ती साळवे सुरेश उजगरे, लोखंडे, अजय किरवले, विजय किरवले, सागर किरवले, निकेश किरवले, रामेश्वर काटकर यांची मान्यवर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दयानंद झिंजुर्डे यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मकतेने अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आणि स्पर्धात्मकतेकडे प्रामाणिक दृष्टीकोनाने पाहण्याचे आवाहन केले.
   सूत्रसंचालन ऋषिकेश गावडे यांनी केले, तर आयु. अमोल किरवले यांनी आभार प्रदर्शन करून सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “नालंदा अभ्यासिकेचे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक व नैतिक बळ देणे हे आहे.”
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत प्रशासनातील कार्यपद्धती, आवश्यक पुस्तके आणि अभ्यासातील अडचणी यावर चर्चा केली. आयु. महादेव किरवले यांनी संयमी, वास्तववादी आणि प्रेरणादायी उत्तरांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला.
तसेच अशोक शिंदे व कुणाल कांबळे यांनी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेविषयी माहिती दिली, तर प्रा. अमोल भीवराव किरवले यांनी IIT व विज्ञान शाखेतील संधींवर मार्गदर्शन केले.
   या सत्राने सिरसाळा परिसरातील स्पर्धा परीक्षार्थ्यांमध्ये नवचैतन्य आणि नवउर्जा निर्माण केली. विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे सत्र आमच्या प्रवासातील दिशा देणारे ठरले.”
नालंदा अभ्यासिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा, आत्मविश्वास आणि प्रेरणा मिळत आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने