धम्माच्या प्रकाशात सिरसाळा उजळले” — ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथवाचन समारोप सोहळा उत्साहात संपन्न
(सिरसाळा) — यशोधरा महिला मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती शाखा सिरसाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” ग्रंथवाचन समारोप सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. प्रथमता गावातून धम्मरैलीचे आयोजन पार पडले या सोहळ्याने संपूर्ण सिरसाळा धम्म, समता आणि प्रबोधनाच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. राजेश पवार यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून मा. रवींद्र जोगदंड (उपायुक्त, स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते, तर धम्मदेशना भंते विनाचार्य (आंदोलक, महाबोधी महाविहार) यांनी केली. विशेष उपस्थितीमध्ये आर्याजी सामावती, मा. सिद्धार्थ सूर्यवंशी, मा. सुभाष जाधव, आणि कॅप्टन राजाभाऊ आठवले (समता सैनिक दल) यांचा सहभाग लाभला.
श्रावण पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या गेल्या तीन महिन्यांपासून प्रा. दयानंद झिंजुर्डे यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे सातत्यपूर्ण वाचन व स्पष्टीकरण करून जनसामान्यांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रचार केला. त्यांच्या या धम्मसेवेचा गौरव म्हणून त्यांचा तथागत बुद्धाची मूर्ती व कपड्यांचा आहेर देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. रवींद्र जोगदंड यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हटले —
“तथागत गौतम बुद्धांचा धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हेच आजच्या समाजरचनेच्या सर्व आजारांवरचे खरे औषध आहेत. ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ वाचणे म्हणजे आपल्या जीवनाचे पुनरावलोकन करणे होय. प्रत्येक गावात हा ग्रंथ वाचला गेला, तर समाज अंधश्रद्धा, अन्याय आणि विषमतेतून मुक्त होईल.”
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचन समापनप्रसंगी
भंते विनाचार्य यांनी आपल्या देशनेत स्पष्ट केले —
“धम्म म्हणजे करुणा, समता आणि स्वाभिमान. ज्या धम्माने आपल्याला माणूस म्हणून उभे केले, तो धम्म जपणे हीच खरी साधना आहे. महाबोधी महाविहार हे त्या जागृतीचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमात सुभाष लिंबाजी चोपडे यांनी मनोगत व्यक्त केले. जनाबाई मुरलीधर साळवे यांनी भावपूर्ण भीमगीताने वातावरण भारावले, तर शाहीर रांजवे यांनी गीतातून सामाजिक समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विक्रम धन्वे यांनी प्रभावी शब्दात केले, तर आयु विलास बनसोडे यांनी मनःपूर्वक आभार मानले. सदरील समारोप सोहळ्याला सिरसाळा व परिसरातील शेकडो उपासक-उपासिका उपस्थित राहिले.

टिप्पणी पोस्ट करा