शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा - मयंक गांधी* *_शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; अंबाजोगाई उपविभागीय अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांचे निवेदन_*

*शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा - मयंक गांधी* 

*_शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; अंबाजोगाई उपविभागीय अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांचे निवेदन_*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी वैजनाथ, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने नुकसान झालेच आहे. त्याबरोबरच संपूर्ण बीड जिल्हा आणि मराठवाड्यातही शेतकरी संपूर्णतः कोसळला आणि कोलमडला आहे. ऐन दसरा आणि दिवाळीचा सणासुदीचा काळ समोर असताना संकटाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी तसेच मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी तीव्र मागणी ग्लोबल विकास ट्रस्टचे अध्यक्ष मयंक गांधी यांनी शासनाकडे केली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव उपजिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते, तर याच सर्व मागण्या आणि इतर अनेक मागण्या घेऊन जिल्हाधिकारी यांच्या दालनात अनौपचारिक बैठक संपन्न झाली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी उपस्थित होते.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावांत जाऊन जलनायक मयंक गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी आणि व्यथा समजून घेतल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संपूर्णतः खचले आहेत. कोणाचे पिके गेली, गुरे - जनावरे गेली, शेतातील साहित्य वाहून गेले तर कोणाची राहती घरे पडली आहेत. या संपूर्ण नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व तत्काळ मदत जाहीर करावी. पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीला आर्थिक मदत दिल्यानंतर त्या जमिनीची पोटखराब क्षेत्र म्हणून 7/12 वर नोंद घेऊन नये तसेच संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी जलनायक मयंक गांधी यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शेकडो शेतकऱ्यांना घेऊन अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले तर जिल्हाधिकारी बीड यांच्या दालनात अप्पर जिल्हाधिकारी आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्या समवेत अनौपचारिक बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल तसेच शासनाला झालेल्या नुकसानीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

*दसरा - दिवाळीपूर्वी मदत करा -मयंक गांधी* 
ऐन सणासुदीच्या काळात अतिवृष्टी झाली आणि सर्वच आनंदावर विरजण पडले. शेतातील उभे पिक तर पाण्याने गेलेच, मात्र सुपीक मातीही वाहून गेल्याने जमीनच राहिली नाही. अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन दसरा आणि दिवाळी पूर्वी भरीव आर्थिक मदत तत्काळ द्यावी यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे मयंक गांधी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने