प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे होणार उद्घाटन
संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक अजयकुमार गंडले यांची निवड
परळी (प्रतिनिधी.) परळी येथे 16 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या 7 व्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते होणार आहे.तर संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत अजयकुमार गंडले यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य संयोजक रानबा गायकवाड व स्वागत समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
परळी वैजनाथ येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरात दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षण मार्गच्या वतीने एकदिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन आदी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रभाकर साळेगावकर यांचे वादळ (कविता संग्रह) हळवे ठसे( हायकूसंग्रह) तूच आमची शान (बालकविता संग्रह) आंघोळीचे झाड (बालकथा संग्रह) तसेच पाणी बाणी हा संपादित कवितांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे.
कवी ,विडंबनकार प्रभाकर साळेगावकर यांना त्यांच्या साहित्य लेखनाबद्दल आचार्य अत्रे आद्य विडंबनकार राज्यस्तरीय पुरस्कार, यशवंत साहित्य गौरव पुरस्कार ,उत्कृष्ट वांडमय निर्मिती पुरस्कार नागोठाने जिल्हा सांगली, लोकसंवाद पुरस्कार उंमरी ,जिल्हा नांदेड, सुबदा प्रतिष्ठान ,सेलू यांचा वांडमय पुरस्कार, स्वर्गीय प्रमोद महाजन साहित्य पुरस्कार, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार आदी पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील विद्यापीठाच्या प्रथम वर्ष मराठी पुस्तकात हायकूचा समावेश करण्यात आलेला आहे. एशियन पोएट्रीमध्ये मराठीतील कवी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात तसेच गोवा राज्यातील अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून यांची उपस्थिती लाभलेली आहे.
संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले अजयकुमार गंडले हे परभणी येथील भदंत उपाली हायस्कूल येथे इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत. व्याख्याते, विचारवंत म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे.त्यांचा नवराष्ट्र निर्माते: डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. तर विश्व मानवतावादाचे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होणार आहे. अजयकुमार गंडले यांचे धर्मयुद्धातील वणवा, साक्षरता काळाची गरज, व्यसनाधीनता व आजचा युवक, अंधारातून प्रकाशाकडे, डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच महिलांचा सन्मान, भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वोच्च योगदान,तसेच दैनिक सम्राटचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तरी जयंती महोत्सव निमित्ताने युनोमध्ये प्रकाशित झालेल्या महा विशेषंकामध्ये लेख प्रकाशित झालेला आहे.
याबरोबरच शेतकरी, कामगार, महिला, उपेक्षित, सामाजिक, शैक्षणिक विषयांवर त्यांनी लेखन केले आहे.साहित्यिक अजयकुमार गंडले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्कार नागपूर येथील भारतीय बहुजन समाज पुरस्कार अमरावती तसेच महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कारांसह गौरविण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा