*देश बदलायचा असेल तर शेतकरी आर्थिक उन्नत झाला पाहिजे - मयंक गांधी*
*_कृषिकुल येथे संवाद माध्यम प्रतिनिधींशी कार्यक्रमास जिल्हाभरातील पत्रकारांची उपस्थिती_*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
जुन्या काळात आपला देश हा "सोने की चिडिया" म्हणून ओळखला जायचा. मध्यंतरीच्या काळात काळानुरूप बदल होत गेले. येथील लोकजीवन, वातावरण, पर्यावरणातील बदल आणि संसाधनांमध्ये खूपच मोठे बदल झाले आहेत. आज देशाची अवस्था सुधारण्यासाठी अनेक स्तरावरून प्रयत्न होतात. अनेक लोकसेवी संस्था आणि लोकसेवक सुधारणावादी काम करत असल्याचे पाहायला मिळते. मात्र जर देशाला घडवायचे असेल तर सर्वप्रथम शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे असे मत ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष जलनायक मयंक गांधी यांनी व्यक्त केले. बुधवार, दिनांक 13 ऑगस्ट रोजी सिरसाळा येथील कृषिकुल येथे आयोजित "संवाद माध्यम प्रतिनिधींशी" या कार्यक्रमात जिल्हाभरातून उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त विजय अण्णा बोराडे, ग्लोबल विकास ट्रस्टचे विश्वस्त हरिश्चंद्र वंगे यांची उपस्थिती होती.
कृषिकुल येथे आयोजित केलेला "संवाद माध्यम प्रतिनिधींशी" कार्यक्रम बुधवारी पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित असलेल्या पत्रकार बांधवांचे शेतकरी टोपी आणि रुमाल देऊन स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना जलनायक मयंक गांधी म्हणाले की, मी सुरुवातील देश पातळीवर राजकीय जीवनात काम केले आहे. परंतु राजकारणाची परिभाषा, त्यातील खेळ आपल्याला अजिबात जमणार नाहीत हे माझ्या जेव्हा लक्षात आले तेव्हा मी ते सोडून दिले. मला खेड्यातील गरीब शेतकऱ्यांसाठी काम करायचे होते. तशी इच्छा उत्पन्न झाल्यानंतर ते कुठे करायचे? असाही प्रश्न पडला. तेंव्हा महाराष्ट्रातील सर्वात दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा ओळखला जायचा, त्यातला त्यात बीड जिल्हा. म्हणून असा एक विचार आला की याच भागाला आपण बदलूया. जर आपण हे करू शकलो तर आपण देशात कुठेही काम करू शकतो असे माझ्या लक्षात आले आणि 2016 पासून मी इथे काम करतोय. सुरुवातीच्या काळात काही मोजक्या गावात लोकांना सोबत घेऊन काम केले. त्यानंतर कामाची व्याप्ती वाढत गेली आणि आजही वाढतच आहे. आज आम्ही ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 4 हजार गावांमध्ये पोहचू शकलो आणि तिथे काम करत आहोत. जलसंधारणासाठी वेगवेगळ्या गावात आणि नद्यांवर काम केल्यानंतर करोडो लिटर पाणी जमिनीत मुरले आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे. ज्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पिकांसाठी झाला. पाणी मिळाले परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवायचे? असा प्रश्न होता. तेंव्हा आम्ही शेतकऱ्यांना रेशीम शेती आणि फळबाग लागवडीसाठी प्रवृत्त केले. शेतीतील खर्च कमी करून जास्त उत्पन्न कसे मिळेल यासाठीचे तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यांना दिले. टाटा सामाजिक संस्थेने या कामाचा सर्व्हे केल्यानंतर ग्लोबल विकास ट्रस्टने केलेल्या कामामुळे मोठा बदल होऊन त्यांचे उत्पन्न कित्येक पटीने वाढल्याचा निष्कर्ष काढला. शेतकऱ्यांचे हजारांचे उत्पन्न आम्हाला लाखांत करायचे असल्याचेही त्यांनी या कार्यक्रमात बोलतांना सांगितले.
*शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी "कृषिकुल"*
जगातील सर्वात हिम्मतवान माणूस जर कोण असेल तर तो शेतकरी. मातीत घाम गाळायचा, राबराब राबायचे, काबाडकष्ट करायचे असाच त्याचा जीवनप्रवास असतो. तो कायम अडचणीत आणि आर्थिक विवंचनेत असतो. मात्र असे असतांनाही तो कधी कोणावर नाराज होत नाही. आता त्याच्या जीवनात आनंदाचे क्षण आणायचे असा आपण पक्का निश्चय केलेला आहे. त्यांना शाश्वत शेतीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण कृषिकुलच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. शेतकऱ्यांनी इथं यावं, शिकावं आणि आधुनिक पद्धतीने शाश्वत शेती करून आर्थिक उन्नती साधावी असेही मयंक गांधी म्हणाले.
*कृषिकुल परिसराची पाहणी व अवलोकन*
कृषिकुल संवाद माध्यम प्रतिनिधींशी कार्यक्रमास संबंध बीड जिल्ह्यातून पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपस्थितांनी कृषिकुल शेतकरी प्रशिक्षण केंद्रात उपलब्ध सर्व सुविधांची पाहणी केली. ज्यामध्ये पाणलोट व्यवस्थापन कक्ष, माती परीक्षण प्रयोगशाळा, पिक संरक्षण कक्ष, शेती अवजार कक्ष, सेंद्रिय निविष्ठा कक्ष, गोशाळा, कंपोष्ट खत विभाग, बायोगॅस विभाग, स्वयंचलित सिंचन प्रणाली, हवामान मापक प्रणाली आदींची पाहणी करून अवलोकन केले.

टिप्पणी पोस्ट करा