विद्यार्थी आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापक किशन रोडे

विद्यार्थी आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापक किशन रोडे 



       शिक्षक हा या देशाचा उद्याची पिढी घडविणारा एक मुख्य घटक असतो.कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याला जसे पाहिजे तसे रुप आणू शकतो तसे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान कार्य करीत असतो.असेच आपल्या 32 वर्षांच्या सेवाकाळात हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनींना घडविणारे, त्यांच्या जीवनाला नवा संस्कारूपी,ज्ञानरुपी आकार देणारे राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक किशन मारोती रोडे हे 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 
    मुख्याध्यापक किशन रोडे हे एक गणित तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या मूळ गावी म्हणजे बोधडी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले .त्यानंतर माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद प्रशाळा ,पार्डी खुर्द येथे आणि त्यानंतर पदवी शिक्षण परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालय येथे घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथून पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांनाही त्यांनी आपले ध्येय गाठले.तो काळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचा काळ होता. हजारो तरुण नामांतरासाठी आंदोलनात रस्त्यावर उतरत होती.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने झपाटून शिक्षण घेत होते.विज्ञान शाखेत असल्यामुळे साहजिकच विज्ञान आणि गणितावर त्यांची पकड होती. ते हसत -  खेळत, सहज आणि सोप्या भाषेत मुलांना गणित शिकवीत असत. आणि मुलेही त्यांच्या विषयात घवघवीत गुण संपदान करून उत्तीर्ण होत असत.
    राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यालयात 1993 मध्ये ते शिक्षक म्हणून नोकरीला लागले. त्यांच्यातील शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन संस्थाचालक कै. प्राचार्य शिवाजीराव दळणर सरांनी त्यांच्यावर शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी टाकली आणि त्यांनी ते आजतागायत  यशस्वीरित्या पार पाडली आहे. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी खांद्यावर आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान देत असताना एकूणच शाळेच्या विकासाचे आणि प्रगतीची तसेच गुणवत्तेची सुद्धा जबाबदारी त्यांनी लिलया पार पाडली.
   शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना त्यांनी राबविल्या. सर्वच विद्यार्थी श्रीमंत असतात असे नाही. अनेकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.गरीब  पालकांना आपल्या मुलांना शाळेचे साहित्य घेऊन देण्याची सुद्धा ऐपत नसते. दोन वेळच्या पोटाची भ्रमंती असणाऱ्या पालकांच्या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य गणवेश दिला जात असे. एवढेच नाही तर त्यांना शाळेपर्यंत घेऊन येण्यासाठी प्रवासाची सुद्धा व्यवस्था शाळेतील शिक्षक व संस्थेच्या  सहकार्याने मुख्याध्यापक किशन रोडे यांनी केली. त्यामुळे आज अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहू शकले आहेत. 
   गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे आणि ही थाप जर सर्वात अगोदर शिक्षकाची पडली असेल तर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नसतो. तो अधिक वेगाने यशाच्या दिशेने धावत सुटतो. शाळेतील अशा गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे प्रामुख्याने त्यांनी आवर्जून केले. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांचे वाचनाची आवड कमी झालेली आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी महावाचन अभियान त्यांनी शाळेत राबविले आणि त्याला चांगले यशही आले.
    कोणतीही शाळा आपल्या परिसरात तेंव्हाच लोकप्रिय होत असते. विद्यार्थी आणि पालकांचा ओढा शाळेकडे तेव्हाच वाढत असतो जेव्हा त्या शाळेची गुणवत्ता कशी असते? शाळेतील विद्यार्थी किती गुणवंत आहेत.शिक्षक कसे आहेत यावरून पालक आपल्या पाल्यांना त्या शाळेत पाठवीत असतात. आज राणीसावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालय म्हणजे एक नामांकित विद्यालय म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक क्षेत्रात शाळेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शाळेच्या निकाल उंचावण्यासाठी ज्यादा तास सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे शाळेचे गुणवत्ता वाढण्यास हातभार लाभला. 
   विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेत नेहमीच विविध प्रकारच्या स्पर्धांचे मुख्याध्यापक किशन रोडे यांनी सतत आयोजन केले. वादविवाद स्पर्धा  असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील अशा प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याचे धाडस त्यांनी निर्माण केले. उद्याचा एक उत्कृष्ट वक्ता अशा शालेय स्पर्धेतूनच घडत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचा एक विद्यार्थी तर जिम्नॅस्टिक मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत खेळला. यामुळे त्यांनी शाळेचे नाव देशपातळीवर पोहोचविण्याचे काम केले. 
    असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले, विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापक किशन रोडे हे 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.एक हसतमुख,सर्व सहकारी शिक्षक, शिक्षिका, संस्थाचालक यांच्याशी मैत्री, स्नेह वृद्धिंगत करणारे, आपल्या गावातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात योगदान देणारे मुख्याध्यापक किशन रोडे यांना त्यांचे पुढील जीवन सुख,समृध्दी तसेच आरोग्यदायी लाभो, सेवानिवृत्ती नंतर सुध्दा त्यांनी समाजाच्या सेवेत, सर्वसामान्य माणसाच्या सेवेत राहवे आणि असेच आनंदी जगावे याच यानिमित्ताने शुभेच्छा.


                रानबा गायकवाड 
               जेष्ठ पत्रकार व साहित्यिक 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने