डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य




डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक कार्य 


     या देशातील सामाजिक परिस्थितीचा जेंव्हा जेंव्हा  आढावा घेतला जातो किंवा या देशाचा सामाजिक इतिहास पाहिला जातो तेव्हा तेव्हा देशातील विषमता, जातीयवाद ,गुलामगिरी यांचे चटके बसलेला अस्पृश्य समाज, गावकुसाबाहेर राहणारा समाज डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आणि या समाजाचे दैन्यावस्था  बदलण्याचे अशक्य असे काम जर कोणी केले असेल तर ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. 
      समाजमहामानव, विश्वरत्न,  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदंर कार्यात सामाजिक सुधारणांना विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ते स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते.
लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करता येते हे बाबासाहेबांनी त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे.
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटत होते. नेमस्त सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाची त्यांनी महाड येथे 1925 मध्ये जाहीर होळी केली होती. त्या काळातील नेमस्त सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे मत होते.
    या देशातील सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर मार्ग म्हणून अवलंब केला आणि ज्या गोष्टी स्वातंत्र्यपूर्व काळात सर्वसामान्य उपेक्षित गोरगरीब अस्पृश्यांना मिळत नव्हत्या त्या गोष्टी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मिळून दिल्या ज्या समाजाला कोणत्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार नव्हते ते हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. 
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक केवळ दलितांचेच कैवारी नव्हते तर या देशातील प्रत्येक जाती धर्माच्या माणसांसाठी बाबासाहेबांनी कार्य केले आहे.या देशातील तमाम महिलांना हिंदू धर्माने कोणतेही अधिकार दिले नव्हते.केवळ चूल आणि मूल एवढ्या पुरतेच महिलांचे जगणे मर्यादित केले होते.या बंधनातून आणि रुढी परंपरा यातून बाहेर काढून महिलांच्या विकासाला जर कोणी गती दिली असेल तर ती केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी.
    क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी जो सामाजिक प्रबोधनाचा पाया घातला होता.ज्या सामाजिक सुधारणा सुरु केल्या होत्या. त्यावर कळस चढविण्याचे महान कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. 

.                    रामराव गाडे 
                सामाजिक कार्यकर्ते 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने