हर हर महादेव.... चाहूर चाहूर चांगभलं... घोषणांनी "कृषीकुल" परिसर दुमदुमला
सिरसाळा / परळी (प्रतिनिधी)
जलनायक मयंक गांधी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या कृषीकूल येथे बैलपोळा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने सर्जा राजाला सजवण्यात आले होते. कृषीकूल परिसरातील कृषी महादेव मंदिर येथे मिरवणूक काढून त्यांना दर्शनासाठी आणण्यात आले व तद्नंतर विधिवत पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला. उपस्थित सर्व कृषीकूल परिवारातील सदस्यांनी हर हर महादेव.... चाहूर चाहूर चांगभला... पाऊस आला चला घराला... आदी घोषणांचा गजर केल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाबद्दल ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा सण. सिरसाळा जवळच असलेल्या “कृषीकुल” येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यंदा चांगले पर्जन्यमान राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कृषीकुल मधील गोशाळेत असलेल्या बैलांसह इतर गायी, वासरे यांना नवी वेसण, घुंगरमाळा, पैंजण, म्होरकी, घाटी, झूल व गोंडे असे विविध प्रकारचे साहित्याने सजवण्यात आले होते. कृषीकूल परिवारातील सर्व सदस्यांनी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा