किस्से जाहिरातीचे भाग (2) पार्टी झोड आहे...

किस्से जाहिरातीचे
भाग (2)

           पार्टी  झोड आहे...
   
   कोण जाहिरातदार कसा आहे आणि कोण कसा नाही याची इत्यंभूत माहिती पत्रकारांना असते. पत्रकारही मोठे हुशार असतात. पार्टी कितीही हुशार असु द्या, जाहिरातीला चकमा देणारी असूद्या त्याच्याकडूनही वेळ पडली की जाहिरात घेतल्याशिवाय राहत नाहीत.नाही तर अशा कार्यकर्त्याचे बातमीत आलेले नाव वगळण्याचे काम मात्र पत्रकार करत असतात.पण अशा जाहिरात दाराककडून बील वेळेवर मिळत नाही हे पत्रकारांनाही माहिती असते. तरीही कधी कधी जाहिरात घेतली जाते.असाच एक गंमतीदार किस्सा आहे. हा किस्सा आमचे दिवंगत जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर खूप रंगवून सांगायचे.
   तशी ही घटना अनेक वर्षांपूर्वीची आहे.आणि  याचा प्रत्यय मराठवाड्यातील संपादक आणि पत्रकारांना सुध्दा अनेक वेळा आला असेल. विदर्भामध्ये  एका फार मोठ्या नेत्याची सभा होती .सभा म्हटले की त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते नेत्याच्या स्वागताचे आणि कार्यक्रमाच्या जाहिराती वर्तमानपत्रांना प्रसिध्दीसाठी देत असतात.
   कार्यक्रमासाठी येणाऱ्या

नेत्याचा एक असाच कार्यकर्ता एका वर्तमानपत्राच्या पत्रकाराला म्हणाला,' उद्या माझी जाहिरात द्या.'  आता जाहिरात घ्या म्हटल्यावर कोणता पत्रकार टाळणार आहे. परंतु सदर पत्रकाराला माहिती होते ही व्यक्ती पैसे लवकर देत नाही. आणि  तरीही त्या पत्रकाराने या महाशयांची जाहिरात घेतली.
   जाहिरात घेतल्यानंतर त्या वेळेला आजच्यासारखे संगणक नव्हते किंवा मोबाईल, ईमेल नव्हते. एक तर टपालाद्वारे किंवा फॅक्स द्वारे बातम्या आणि जाहिराती पाठवाव्या लागत होत्या. सदर दैनिकाच्या पत्रकाराने त्या कार्यकर्त्याचे एका पानावर जाहिरात मॅटर लिहिले आणि त्या जाहिरात मॅटर च्या खाली एक ओळ लिहिली. ही ओळ अत्यंत महत्त्वाचे होती.ती अशी " पार्टी झोड आहे.हिशोबानं घ्या" आणि जाहिरात पाठवून दिली.
     दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम होता. आणि जाहिरात देणाऱ्या  व्यक्तीने आपली जाहिरात पेपरात कशी छापून आली आहे हे पाहिले. जाहिरात तर जशी सांगितले तसे आली होती. परंतु त्या जाहिरातीमध्ये एक चुक झाली होती.ती चुक खळबळ उडवणारी अशी होती. जे पत्रकाराने जाहिरात मॅटर पाठवताना लिहिले होते.त्यामध्ये ' 'पार्टी झोड आहे. हिशोबाने घ्या' हे जशाला तसे छापून आले होते. आता काय करणार. पेपर संपूर्ण विदर्भात वाटपही झाला होता. आता या सर्व प्रती वापस घेणे शक्य नव्हते.
   साहजिकच जाहिरात देणारा सदरील नेता नाराज झाला असणार. पत्रकारावर राग व्यक्त केला असणार. पण त्याला आता काहीच पर्याय शिल्लक राहिला नव्हता जे व्हायचे ते झाले होते. पत्रकाराने जाहिरात देताना आपल्या संपादकांना सावध करण्यासाठी आणि जाहिरातीचे मॅटर तुमच्या हिशोबाने म्हणजेच पैशाच्या हिशोबाने घ्या, त्यांचा काही खरं नाही, पैसे वेळेवर मिळत नाही या हिशेबाने जाहिरात घ्यावी अशी सूचनावजा ओळ लिहिली होती. परंतु ही चूक त्या दैनिकातील ऑपरेटरची होती. संपादकीय विभागातील काम पाहणाऱ्या उपसंपादकांची, जाहिरात व्यवस्थापकांची होती.
   कोणत्याही मॅटर, बातमी कोणत्याही दैनिकाला गेल्यानंतर त्या दैनिकात संपादक विभागात वेगवेगळे विभाग सांभाळणारे पत्रकार असतात. कदाचित त्यांनीही हे वाचले नसेल का किंवा जाणीवपूर्वक जशी जाहिरात आली तशी छापून प्रसिद्ध केली असणार परंतु यातून मात्र खूप मोठा विनोद निर्माण झाला. आणि वाचकांनाही असेही काही नेते कार्यकर्ते असतात याचा उलगडा झाला.
   आता बीड जिल्हा किंवा परळीचा विचार केला तर परळीतही असे अनेक जण आहेत.एक तर पत्रकार अशा व्यक्तींना जाहिरातीच मागत नाहीत.कारण त्यांनी जाहिराती जरी दिल्या तरी बील मिळतील याची शाश्वती नसते. आणि बील दिले तरी काही महिने, काही वर्षं लोटलेली असतात. एवढेच आहे वरील प्रमाणे मॅटर मात्र कोणी लिहीत नाही.
    आता असे अनेक अनुभव पत्रकार बांधवाना येत असल्यामुळे अनेक वेळा जाहिरात नगदी द्या असा सूर पत्रकार लावतात.मोठी दैनिके तर अगोदरच पत्रकारांचे चेक घेऊन बसलेले असतात. त्यामुळे एखाद्या जाहिरात दाराने जर फटका दिला किंवा जेवढे सांगितले तेवढे पैसे दिले नाहीत तर त्याचा भुर्दंड मात्र पत्रकारांना बसतो. हे कटुसत्य जनतेला माहीत नसते. आणि नेते आणि कार्यकर्त्यांनाही.

            रानबा गायकवाड
         7020766674

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने