पर्यावरण रॅली परळीत, पर्यावरण मंत्री पद परळीला पण स्वागताला भाजपाचे कोणीच नाही अमरावतीहून पर्यावरणाचा संदेश घेणारी सायकल वारी परळी वैजनाथ येथे दाखल

पर्यावरण रॅली परळीत, पर्यावरण मंत्री पद परळीला पण स्वागताला भाजपाचे कोणीच नाही 


अमरावतीहून पर्यावरणाचा संदेश घेणारी सायकल वारी परळी वैजनाथ येथे दाखल



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –
  आषाढी वारीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधत अमरावती येथील ४५ पर्यावरणप्रेमी युवकांनी प्रदूषणमुक्त भारताचा संकल्प घेऊन काढलेली पर्यावरण रॅली परळीत दाखल झाली. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री पद परळीकडे अर्थातच नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे आहे. मात्र पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या रॅलीचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोणीच उपस्थित नसल्याचे दिसले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीच्या वतीने सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सर्वांचे पुष्पहार व प्रभुवैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
       वाढते प्रदूषण, निस
र्गाचा ऱ्हास आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर समाजात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी अमरावतीच्या युवकांनी एकत्र येत ही सायकल वारी सुरू केली. प्रभू श्री वैद्यनाथाच्या चरणी “प्रदूषणमुक्त भारत” या संकल्पाची त्यांनी प्रार्थना केली.या प्रेरणादायी उपक्रमाचे स्वागत श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी केले. त्यांनी सर्व युवकांचे पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते  ॲड. मनोज संकाये, माजी उपनगराध्यक्ष सुरेश टाक, इंजिनीयर मुकुंद देशपांडे, प्रकाश जोशी, पत्रकार बालाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
    या वेळी श्री वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख म्हणाले, “पर्यावरण रक्षणासाठी युवकांनी घेतलेला हा उपक्रम समाजासाठी अत्यंत दिशादर्शक आहे. निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी जनजागृतीची गरज आहे, आणि ही सायकल वारी त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. वैद्यनाथ नगरीने नेहमीच समाजहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले असल्याचे ते म्हणाले.यानंतर सर्व युवकांनी प्रभू श्री वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. “हर हर महादेव! वैद्यनाथ भगवान की जय!” अशा जयघोषात ही पर्यावरण संदेश देणारी सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी रवाना झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने