पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात बौद्ध समाजावर अन्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात बौद्ध समाजावर अन्याय 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

 

बीड ( उत्तम हजारे,रानबा गायकवाड)   महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे तसेच माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात बौद्ध समाजावर अन्याय होताना दिसून येत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व बहुजन समाजाचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभारण्यासाठी परवानगी द्यावी  या मागणीसाठी आज दिनांक 20 मे पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बौद्ध समाजाच्या वतीने महिला,लेकरा बाळासह उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वतीने पाच उपोषणकर्त्यांना परवानगी दिली असून भारतीय न्याय संहिता 2023 कलम 168 नुसार नोटीसही दिली आहे.
   याबाबत परळी तालुक्यातील दौनापूर येथील बौद्ध समाजाने बीड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते .या निवेदनात  म्हंटले होते की,दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी दौनापूर  येथील बौद्ध समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीला बौद्ध वस्ती समोरील रस्त्यावर प्रवेशद्वार अर्थातच कमान उभारण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला. त्यावर ग्रामपंचायतीने परवानगी तर दिलीच नाही उलट  सरपंच राजेभाऊ प्रभाकर आघाव यांनी  ग्रामपंचायतीचा ठराव घेतला.व ठरावा द्वारे कमानीला परवानगी देण्यात येणार नाही असे सांगितले होते.त्यानंतर दौनापूर येथील बौद्ध समाजाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार,( कमान)  करण्याची परवानगी द्यावी अन्यथा 20 मे २०२५ पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला
होता. 
   दिलेल्या निवेदनानुसार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे तसेच उपोषण कर्ते रामचंद्र भगवान घाडगे, चंद्रमुनी रामकिशन घाडगे, रामचंद्र दिलीप बनसोडे, हरिभाऊ साधू घाडगे, किशन अच्युत घाडगे यांच्यासह  रोहिदास घाडगे, लक्ष्मण घाडगे, नागुराव गायकवाड, दिलीप बनसोडे ,कोंडीराम घाडगे, कमलाकर घाडगे, एडवोकेट विवेक वैद्य, धनंजय घाडगे ,दीपक बनसोडे, सुजित घाडगे, फुलचंद घाडगे, सचिन घाडगे, महेंद्र घाडगे, छगन घाडगे, कालिंदा घाडगे, रेखा घाडगे, कावेराबाई घाडगे, वैजयंती घाडगे, मोहिनी घाडगे, रेखा बनसोडे, मंदाबाई वाव्हळे आदी उपोषणाला बसले आहेत.
   दरम्यान या उपोषणावर जिल्हा प्रशासन तसेच उपोषण सोडविण्यासाठी आणि कमानीला परवानगी द्यावी यासाठी पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे तसेच आमदार धनंजय मुंडे हे काय भूमिका घेतात याकडेही जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे लक्ष लागले आहे.
 

    
   

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने