बीड जिल्ह्याला विमानतळाची खरच गरज आहे का,? परळी- बीड- नगर रेल्वे सुरू होणे गरजेचे

बीड जिल्ह्याला विमानतळाची खरच गरज आहे का,?  परळी-  बीड- नगर रेल्वे सुरू होणे गरजेचे 

परळी (रानबा गायकवाड) बीड जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊसतोड कामगारांचा पुरवठा करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अजूनही बीडचा आर्थिक मागासलेपणा गेलेला नाही. त्यामुळे बीड जिल्ह्याला विमानतळाची नाही तर परळी, बीड, नगर रेल्वे सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे दळणवळण व व्यापार वाढू शकतो. सर्वसामान्यांच्या प्रवासाचा प्रश्न सुटू शकतो. याकडे पालकमंत्री ना. अजित दादा पवार व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी  लक्ष द्यावे अशी चर्चा जनतेतून होत आहे. 
    काल बीड येथे पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नावर पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी बी
ड येथे लवकरच विमानतळ बांधण्यासाठी आपण जागा भूसंपादित करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 
     नगर, बीड परळी हा रेल्वे मार्ग व्हावा हे गेल्या पन्नास वर्षापासून बीड जिल्हावासियांचे स्वप्न आहे. हे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. नगर मार्गे रेल्वेचे काम बीड आणि पुढे वडवणीपर्यंत झालेले आहे. वडवणी पासून परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे ट्रॅक व विविध ठिकाणी असणारे रेल्वे स्थानकांचे काम अद्याप सुरूही झालेले नाही. या रखडलेल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने निधी देऊन तातडीने रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
    बीड जिल्ह्यात अजूनही महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यावर जाणाऱ्या ऊसतोड कामगारांची संख्या दहा लाखाच्या वर आहे. जिल्हा शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या अजूनही मागासलेला आहे. त्यामुळे या मूळ प्रश्नांकडे लक्ष देऊन लोकांचा आर्थिक विकास कसा होईल, जिल्ह्यातील परळी अंबाजोगाई आदि  तालुक्यात एमआयडीसी लवकर सुरू झाल्यास तरुणांच्या हाताला काम मिळेल. सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा नामदार अजितदादा पवार हेच आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळावर खर्च न करता रेल्वे व इतर मूलभूत प्रश्नावर खर्च केल्यास जिल्ह्याचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने