फुले".... क्रांतीसुर्याची क्रांतिज्योत अखंड तेवत ठेवणारा जिवंत ईतिहास! © दत्तात्रय काळे (पत्रकार) _****चित्रपट समीक्षण****_ ( परळीत चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

"फुले".... क्रांतीसुर्याची क्रांतिज्योत अखंड तेवत ठेवणारा जिवंत ईतिहास!

© दत्तात्रय काळे (पत्रकार)
_****चित्रपट समीक्षण****_

( परळीत चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद)

    क्रांती.... शब्द जरी उच्चारला तरी अंगात उत्साह संचारतो. नवा जोश आणि स्फूर्ती येते. जगाच्या पाठीवर मानव कल्याणासाठी अनेक लढाया झाल्या. काही लढाया रणमैदानात लढल्या गेल्या, काही सामाजिक स्तरावर तर वैचारिक पातळीवर लढल्या गेल्या. परंतु त्यांचे अंतिम उद्दिष्ट हे समाजाचे उत्थान आणि मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे होते. आपल्या देशाच्या मातीनेही अनेक संघर्षांना जन्म घातलेला आहे. जाज्वल्य असा ईतिहास या मायभूमीत रचला गेला आहे. शतकानुशतके आवश्यक असलेले सकारात्मक बदल जन्माला घालण्याची ताकद जर कशात असेल तर ती आपल्या महापुरुषांच्या विचारात आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीत आहे. "क्रांती" घडवण्यासाठी प्रचंड साहस, धैर्य आणि संयम महत्वाचा असतो. स्वतःचा जीव जोखमीत घालून समाजाच्या उत्कर्षासाठी ज्यांनी स्वतःचे
संपूर्ण जीवन अर्पित केले अशा व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास आणि त्यांचा इतिहास हा आजच्या पिढीला एखाद्या दीपस्तंभाप्रमाणेचे आहे. 
   लिहिलेला इतिहास वाचला गेला, त्याला आत्मसात केले गेले तर नवा ईतिहास आणि नवी क्रांती घडून येते. मात्र आजच्या धावत्या युगात वचन संस्कृती लोप पावत चालल्याचे विदारक चित्र पहायला मिळते. त्यावर एकमेव उपाय म्हणजे आपल्या महापुरुषांचा जीवनप्रवास हा दृकश्राव्य माध्यमातून या पिढीला दाखवायला हवा. तसे प्रयत्नही होतांना दिसत आहेत ही नक्कीच एक आनंदाची बाब आहे. आज शहरातील काही प्रतिष्ठित मंडळी, विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ते आणि सहकारी पत्रकार बांधवांच्या समवेत "फुले" हा चित्रपट सामुहिकरीत्या पाहण्याचा योग आला, नव्हे तो घडवून आणला गेला. त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या व्यक्तिमत्वांचे कौतुक वाटते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यावर लिहावेसे नक्कीच वाटले म्हणून हा अल्प लेखन प्रपंच.....

"फुले" हा हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनुवादित झालेला चित्रपट 25 मे रोजी सर्वत्र प्रसारित झाला. खरतर प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीची होती. मात्र "भारतीय चित्रपट प्रमाणन मंडळ" (सेन्सॉर बोर्डाने) या चित्रपटावर काही आक्षेप घेतले होते. त्यात दुरुस्ती केल्यानंतर तो सर्वत्र प्रसारित करण्यात आला. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव यांच्या संघर्षमय जीवनाचा जिवंत ठाव घेणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाच्या संपूर्ण कालावधीत श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करून घेतांना आणि त्यांना संपूर्ण काळ आपापल्या जागेशी स्तब्ध बांधून ठेवणारे चित्रीकरण अगदी रचनात्मक पद्धतीने केले गेले आहे. 
   चित्रपटाचे संवाद लेखन अतिशय लालित्यपूर्ण आणि सुबक पद्धतीने करण्यात आले असून, त्यांना मुर्त स्वरूप देणाऱ्या कलाकारांनी अतिशय गांभीर्यपूर्वक काम केल्याचे पहायला मिळते. एकंदरीतच ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या फुले दांपत्याच्या व्यक्तिमत्वाला शोभेल अशी भूमिका यातील सर्वच कलाकारांनी साकारली. 18 व्या शतकातील सामाजिक स्थिती, त्या काळातील लोकजीवन, सामाजिक समस्या आणि आवश्यक बदलांसाठी करण्यात आलेला संघर्ष या चित्रपटाच्या निमित्ताने अधोरेखित होतो.

  स्त्रियांना उंबऱ्याच्या बाहेर तर सोडा परंतु पदराच्या बाहेर तोंड काढण्याची मुभा नव्हती त्या काळात स्त्री शिक्षणाची चळवळ उभी करणे नक्कीच सोपे काम नव्हते. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने निर्माण केलेल्या सामाजिक पायऱ्या आणि त्यात दाबला गेलेला शूद्र समाज यांची अवस्था तर अत्यंत दयनीय होती. शिक्षणाची अनुमती नसलेल्या समाजातील स्त्रियांना शिक्षित करण्याचं आव्हानात्मक काम त्या खडतर काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. कौटुंबिक आणि सामाजिक संकटांचा सामना करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना जी खंबीर साथ दिली त्याशिवाय ही चळवळ उभीच राहू शकत नव्हती. अगोदर आपल्या पत्नीला शिक्षित करून इतर स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. स्त्री शिक्षणाच्या या चळवळीत फातिमा शेख आणि मुक्ता साळवे यांचीही क्रांतिकारी साथसोबत मिळाली. 
   सामाजिक परिवर्तनाची ही चळवळ देशातील सर्वाधिक शक्तिशाली आणि दूरगामी बदल घडवणारी क्रांतिकारी चळवळ ठरली. कारण शिक्षणाशिवाय दबलेल्या आणि मागासलेल्या समाजाचा उत्कर्ष होणे शक्य नाही हे महात्मा फुलेंना लक्षात आलेले होते. आज जेंव्हा सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतात तेंव्हा त्याचे संपूर्ण श्रेय "फुले" दांपत्याला द्यावे लागते. अगदी अलीकडच्या काळात सैन्यदलात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना नावाजले जाते तेंव्हा नक्कीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या आठवणी जागवल्या जातात. त्यांनी केलेला त्याग आणि संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो. शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यामुळे अनेक सामाजिक बदल मागील 200 वर्षांत घडून आले. अनिष्ट रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा निर्मूलन होऊ शकले. क्रांतीची ही मशाल ज्यांनी पेटवली त्या सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण जागवणारा "फुले" हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या कुटुंबासमवेत पाहावा असा हा चित्रपट आहे. आपणही नक्की पहा आणि इतरांना प्रोत्साहित करा... हीच आपल्या महान क्रांतिज्योतीला आणि क्रांतीसुर्याला आदरांजली असेल....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने