करोडो रुपये आले, आणि खर्चही झाले
रस्त्यांवरील पॅच परळीकरांसाठी तसेच राहिले
परळी प्रतिनिधी. परळी शहरातील रस्त्यांसाठी करोडो रुपयांचा निधी मागील काही वर्षात आला.आलेला निधी खर्चही झाला पण रस्त्यावर असणारे अनेक ठिकाणचे खड्डे आणि पॅच मात्र परळीकरांसाठी काम करणाऱ्यां गुत्तेदारांनी पाठीमागे तसेच ठेवल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य परळीकरांना खड्डा आणि पॅच आला की आदळ्याचा अनुभव घ्यावा लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील रस्ते आधुनिक आणि चकचकीत व्हावेत, परळीतील रस्त्यावर वाहन चालवताना वाहनधारकांना कोठेही खड्डा -खुड्डा जाणवू नये,पायी चालणाऱ्या नागरिकांना आरामदायी चालता यावे म्हणून अगोदर नगरोत्थान योजनेतंर्गत 110 कोटी रुपये व त्यानंतर वाढीव शहरातील रस्ते आणि नाल्यांसाठी सुमारे 63 कोटी रुपयांचा निधी आला.याबरोबरच इतर वेगवेगळ्या फंडातूनही बरेचसे रस्ते झाले आहेत.काहींचे कामे अजूनही मुदत संपली तरी चालूच आहेत.
दरम्यान आलेल्या करोडो रुपयांपैकी बहुतांश निधी उचलला गेला आहे. परंतु रस्ता केल्यानंतर दोन रस्त्याच्या मध्ये असणारे पॅच मात्र अनेक ठिकाणी संबंधित गुत्तेदारांनी अद्याप भरले नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून जाताना आदळा सहन करावा लागत आहे. अनेक जण तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे पडून जखमी झाले आहेत. याकडे मात्र कोणाचेही लक्ष नाही त्यामुळेच करोडो रुपये आले आणि खर्चही झाले परळीकरांच्या माथे मात्र खड्डे आणि पॅच कायम राहिले असेच म्हणावे लागेल.


टिप्पणी पोस्ट करा