सामुदायिक विवाह सोहळ्या सारख्या कार्यक्रमांमुळे परळीचे नाव सकारात्मक दृष्टीने घेतले जाईल - मयंक गांधी
ग्लोबल विकास ट्रस्ट आणि बोरोसिल परिवाराचे परळीकरांकडून आभार
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
सामुदायिक विवाह सोहळा सारख्या सामाजिक कार्यक्रमामुळे परळीचे नाव नेहमीच सकारात्मक दृष्टीने घेतले जाईल यासाठी आपल्याला सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा उत्कर्ष साधण्यासाठी मोठी सामाजिक चळवळ उभी करायची असून त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे असल्याचे प्रतिपादन ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांनी केले. ग्लोबल विकास
ट्रस्ट आणि बोरोसिल परिवार यांच्या वतीने शनिवारी परळीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी नववधू वरांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
ट्रस्ट आणि बोरोसिल परिवार यांच्या वतीने शनिवारी परळीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी नववधू वरांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
शनिवार, दिनांक 10 मे रोजी परळी वैजनाथ येथे ग्लोबल विकास ट्रस्ट आणि बोरोसिल परिवार यांच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात ११ नवदाम्पत्य विवाह बंधनात अडकले. ट्रस्टकडून नवदाम्पत्याला सर्व संसारोपयोगी वस्तू तर देण्यात आल्याच मात्र त्यासोबतच नववधूच्या नावाने ७० हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली. विशेष म्हणजे हा सोहळा संपन्न होत असताना हुंडा देणार नाही आणि घेणार नाही अशी सर्वांनी शपथ घेतली. या विवाह सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते तथा नामांकित शल्यविशारद डॉ.हरिश्चंद्र वगे, डॉ.संतोष मुंडे, माजी नायब तहसीलदार बाबुराव रूपणर, खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून, गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींच्या विवाहास मोठा हातभार लागल्यामुळे ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष मयंक गांधी यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.
आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे कौतुक
ग्लोबल विकास ट्रस्ट आणि बोरोसिल परिवार यांच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळा हा अगदीच आगळावेगळा सोहळा असल्याची सर्वत्र चर्चा झाली. हुंडा घेणार नाही आणि देणार नाही अशी सर्वांना या सोहळ्यात शपथ देण्यात आली तर संपूर्ण सोहळा पर्यावरण पुरक करण्याच्या अनुषंगाने प्लॅस्टिकचा शून्य वापर करण्यात आला. या सोहळ्यास हजारो मान्यवर नागरिकांची उपस्थितीत होती.


टिप्पणी पोस्ट करा