शिवशाहीत आदर्श राज्यव्यवस्था होती - चेतन निसर्गंध
महापुरुषांच्या इतिहासाचे सतत स्मरण झाले पाहिजे - पो.नि.धनंजय ढोणे
उत्कृष्ट पत्रकारांचा मूकनायक पुरस्काराने सन्मान
परळी/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या लोकांसाठी तसेच महिलांसाठी समान न्यायाचे राज्य होते. त्यामुळे त्यांची राज्यव्यवस्था आजही एक आदर्श राज्यव्यवस्था म्हणून गणली जाते, असे महत्त्वपूर्ण विचार फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक चेतन निसर्गंध यांनी व्यक्त केले. ते परळी येथे आयोजित 'शिवशाहीचा प्रेरणादायी इतिहास व वर्तमान' या कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक ढोणे यांनी महापुरुषांच्या इतिहासाची उजळणी करणे आणि त्याचे सतत स्मरण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवनात छत्रपती प्रताप सिंह भोसले महाराज यांच्या १० एप्रिल १८१८ रोजी झालेल्या सातारा गादीवरील पुन:स्थापनेच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान शहरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम देऊन 'मूकनायक' पुरस्काराने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे हे होते. विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार धनंजय अरबुने, रामप्रसाद गरड, राजेश साबणे, ओम प्रकाश बुरांडे, परळी औद्योगिक विकास केंद्राचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत इंगळे, महापारेषणचे सुंदर आमले, बिभीषण लंकेश, चंद्रशेखर देशमुख, प्रशांत आल्टे, लक्ष्मण वैराळ, प्रा. प्रवीण फुटके, श्रीराम लांडगे, सम्राट गित्ते, अजय फड, आकाश देवरे, बाबा शेख, हरिभाऊ आगलावे , मयूर अरबुरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या धनंजय आढाव, रानबा गायकवाड, मोहन व्हावळे, बालाजी ढगे आणि महादेव शिंदे या पाच पत्रकारांना 'मूकनायक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रानबा गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन स्वागताध्यक्ष तथा फुले-आंबेडकरी अभ्यास समूहाचे इंजि. भगवान साकसामुद्रे यांनी केले, तर नितीन ढाकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा