भाजपा नेते विकासराव डुबे यांच्या मुलाला अपहरण करून लुटले
केज नंतर परळी येथील घटनेने बीड जिल्हा हादरला
परळी प्रतिनिधी. माजी ग्रामविकास मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आमदार पंकजाताई मुंडे यांचे विश्वासू समजले जाणारे विकासराव डुबे यांच्या मुलाचे काल दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री अपहरण करून लुटल्याची घटना घडली असून याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी अज्ञात पाच जनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना काल घडली होती. तर आज परळीतील प्रतिष्ठित व्यापारी, राजकीय नेते विकासराव डुबे यांच्या चिरंजीवास लुटल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे.
याबाबत भाजपा नेते व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता ते औद्योगिक वसाहत येथील त्यांच्या कारखान्यातून घराकडे मोटरसायकल वरून निघाले होते. यावेळी रस्त्यात पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार आडवी लावून त्या कारमधील चार ते पाच जणांनी अमोल डुबे यांना जबरदस्तीने पकडून कारमध्ये बसविले व ते अंबाजोगाईच्या दिशेने निघाले.
अपहरण करून अपहरणकर्ते कारने कनेरवाडी येथे आले असता तेथे गाडी बंद पडली. यावेळी त्यातील दोघांनी खाली उतरून गाडी ढकलली व पुन्हा चालू झाल्यानंतर ते पुन्हा अंबाजोगाईच्या दिशेने निघाले. परंतु अंबाजोगाईच्या घाटाच्या वर असणाऱ्या हॉटेल नंदनवन जवळ पुन्हा गाडी बंद पडली. त्यावेळी त्या गाडीतील अपहरण करणारांनी अमोल डुबे यांना गाडीतून खाली उतरून जवळ असणाऱ्या दरीत नेले व तेथे त्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
धमकीला घाबरून अमोल डुबे यांनी प्रथम त्यांच्या पत्नीला फोन केला व नंतर श्रीनिवास बंग यांना फोन करून त्यांच्याकडे ड्रायव्हर पाठवून नगदी तीन लाख रुपये व 10 तोळे सोन्याचे बिस्किटे मागवून घेतली. अपहरणकर्त्यांनी अमोल डुबे यांच्याकडील नगदी तीन लाख 87 हजार रुपये, 10 तोळे सोने, गळ्यातील एक तोळे सोन्याचे लॉकेट ,पाकिटातील नगदी 1 हजार रुपये असा एकूण 8 लाख 28 हजार 300 रुपयांची लूट केल्यानंतर तेथून पुढे काही अंतरावर अमोल डुबे यांना घेऊन गेल्यावर गाडी थांबवली व उद्या परत 10 लाख रुपयांची व्यवस्था कर आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली तर जिवंत ठेवणार नाहीत अशी धमकी देत रस्त्यावर सोडून देऊन आरोपी अंबाजोगाई च्या दिशेने पसार झाले.
याप्रकरणी अमोल डुबे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिसांनी अज्ञात पाच आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 कलम 126 (2), कलम 140 (2), कलम 308 (3), कलम 308 (4), कलम 308 ( 5), कलम 351 (2), कलम 351 (3), कलम 3(5), यासह शस्त्र अधिनियम 1959 नुसार कलम 3,व कलम 25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टुवार हे करीत आहेत.
दरम्यान या घटनेने परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्हा हादरला आहे. केज नंतर परळी येथे घडलेल्या या घटनेने पोलिसांसमोर एक आव्हान उभे ठाकले आहे. तर सर्वसामान्य नागरिक व व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा