लालपरीच्या शीटला दगडाची पाचर

लालपरीच्या  शीटला दगडाची पाचर 


परळी ( रानबा गायकवाड)       लालपरी अर्थातच महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची एस.टी. म्हणून ओळख असलेल्या लालपरीची  अवस्था दिवसेंदिवस अत्यंत खराब होत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या लाल परीच्या बिकट अवस्थेचा आणखी एक नमुना नुकताच पहावयास मिळाला. लालपरी चालविणाऱ्या ड्रायव्हरच्या सीटला ती जास्त आदळू नये म्हणून लोखंडाच्या शीटला दगडाची पाचर बसवावी लागली. तेव्हा कुठे सीट व्यवस्थित झाल्याचे दिसून आले. 
      याबाबत अधिक माहिती अशी की काल पाथ्री येथून परळीला येणाऱ्या बस मध्ये मी बसलो होतो. गाडी खचाखच भरल्यामुळे जागा नसल्याने ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असलेल्या सीटवर मी बसलो.  गाडी दुपारी तीन वाजता सुटली ती बाभूळगाव येथे आल्यानंतर थांबली. ड्रायव्हर खाली उतरला आणि रस्त्याच्या कडेला असलेला एक छोटा दगडाचा तुकडा घेऊन आला. मी विचार केला ड्रायव्हरला दगडाच्या तुकड्याची गरज काय ? ड्रायव्हरने थोड्यावेळाने तो तुकडा सीटच्या खाली असणाऱ्या लोखंडी पाईपंच्या खाली व्यवस्थित सीट वर उचलून दाबून बसविला आणि त्यानंतर तो सीट
वर बसला. आणि गाडी चालू केली. गाडी रस्त्यावर पुढे धावू लागली. 
     मी एक सारखा त्या दगडाच्या पाचराकडे बघू लागलो. ड्रायव्हर कडे बघू लागलो. आता सीट ड्रायव्हरला  कम्फर्टेबल वाटत होते. त्याने त्याला भेडसावणारी समस्या स्वतःचे डोके वापरून सोडविले .परंतु माझ्या मनात प्रश्नांचे काहूर माजू लागले. शासन कित्येक योजना राबवीत आहे. एस टी .बस मधून प्रवास करणाऱ्यांना अनेक सवलती जाहीर करीत आहे. परंतु महाराष्ट्रातील रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बसेसची काय अवस्था आहे? किती मोडकळीस आलेल्या आहेत? अनेक गाड्यांचे टायर खराब आहेत .अनेक गाड्यांचे पत्रे फाटलेले आहेत. अनेक गाड्यांच्या काचा फुटलेले आहेत. अशा अवस्थेत एसटी कर्मचारी महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना दररोज सेवा देतात. 
     परंतु या सेवा देताना महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या लालपरीची  अवस्था किती बिकट आहे. सवलतींच्या ओझ्याखाली लाल परी पार दबून गेली आहे. तरी तिला दुरुस्त करण्याकडे आणि तंदुरुस्त करण्याकडे शासन आणि प्रशासनाला वेळ दिसत नाही. आणि त्यावर खर्चही करावासा वाटत नाही असेच लालपरीची अवस्था बघून नक्कीच जनतेला जाणवत आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने