वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा धोक्यात माजी नगराध्यक्षांनीच थेट मंदिराच्या शिखरावरच चालवला हातोडा


वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा धोक्यात


माजी नगराध्यक्षांनीच थेट  मंदिराच्या शिखरावरच चालवला हातोडा 



परळी / प्रतिनिधी

        देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिराची सुरक्षा धोक्यात आली असून चक्क माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी मंदिराच्या शिखरावर चढून हातोडा चालवून तोडफोड केल्याने सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे हे सिद्ध झाले.दरम्यान या प्रकरणी देवल कमिटीने पोलिसांत लेखी तक्रार केल्याचे समजते.
       ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिर हे अतिसंवेदनशील ठिकाण आहे. या मंदिराचा जिर्णोद्धार राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी केला आहे. तसेच मुख्य मंदिराच्या वरती शिखरावर गौतम बुद्धांच्या शिल्प कोरलेले आहे. यापूर्वी या मंदिराला उडवून देण्याच्या धमक्यांचे पत्र आलेले आहे. त्यामुळे सुर
क्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींवर उपाययोजना म्हणून अनेक गोष्टींवर ट्रस्टकडून बंधने घालण्यात आलेली आहेत. मात्र आता परळीचे माजी नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने पाच-सात लोक सोबत घेत,फेसबुक लाईव्ह करत थेट वैजनाथ मंदिराच्या कळसापर्यंत जाऊन या ठिकाणी हातोडा चालवत तोडफोड केली आहे. 
    वैद्यनाथ मंदिराच्या शिखराच्या पायथ्याशी असलेल्या एका खिडकीवजा जागेत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून  टाकण्यात आली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच आक्रमक भूमिका घेत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी वैद्यनाथ मंदिराच्या शिखराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कुलूप तोडून शिखरावर प्रवेश करत बांधकाम करून निर्माण केलेली ही भिंत फोडून टाकली. वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर पायथ्याला शिवलिंग होते जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जायचे. मात्र वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून टाकून ही जागा बंद केली असुन याबाबत दर्शनाला खुले करण्याची मागणी केली होती.मात्र ट्रस्टने हे केले नाही म्हणून ही भूमिका घ्यावी लागल्याचे दीपक देशमुख यांनी सांगितले.
    दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने याप्रकरणी पोलीसांत धाव घेतली असुन अनाधिकृत प्रवेश,मंदिर तोडफोड व विद्रूपीकरण केले म्हणून दीपक देशमुख यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने