कोण लिहिणार ?, सायं.दै.परळी बुलेटीन वर्धापन दिन अंकातील संपादकीय...

   कोण लिहिणार ?,

सायं.दै.परळी बुलेटीन वर्धापन दिन अंकातील संपादकीय........



          समाजात आज अनेक भीषण प्रश्न निर्माण झाले आहेत.शासन प्रशासनत अनेक भ्रष्टाचाराच्या घटना दैनंदिन घडत आहेत.सीबीआय,ईडी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आयकर विभाग, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी पथके,असे शासनाचे अनेक विभाग कार्यरत आहेत.रोज धाडी पडतात.कुणाला अटक होते.कुणी सुटते.कुणाला चौकशीसाठी बोलावले जाते.कुणाच्या चौकशीची नोटीस बजावली जाते.विरोधक आरोप करतात.सत्ताधारी कारवाईचे समर्थन करतात.टीव्हीवर प्रवक्ते तोंड वाजवत राहतात.एकमेंकांची उणे दुणे काढत राहतात.समाजाचे प्रश्न मात्र या सर्व राजकारणाच्या गदारोळात जशाला तसेच राहतात.आजही गरीबी हटली नाही, आजही आमच्या शेतीमालाला रास्त भाव नाही, आजही शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपली नाही.आजही ठरावीक लोकांच्या हातात देशाची अर्ध्यापेक्षा अधिक संपत्ती आहे.तर आजही देशातील कोट्यवधी लोकांना दोन वेळची भाकर भेटत नाही.देशातील ऐंशी कोटी लोकांना रेशनवर स्वस्त धान्य दिले जाते.महणजे आजही ऐंशी कोटी जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे.शहरात इंटरनॅशनल मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा तर खेड्यातील शाळांवर धड नीट पत्रे नाहीत.सुविधा नाहीत.लाईट नाही,पाणी नाही.शिक्षक नाही.आणि सरकारला शिक्षणाव
र खर्च करायचा नाही.जर सरकारला शिक्षणावर खर्च करायचा असता तर खाजगी शाळांचे पेव फुटले नसते.खाजगी शाळांची फी लाखोंच्या घरात गेली नसती.इकडून तिकडून कसेतरी गरीबांची मुले शिकली तर आता सरकारी नोक-या कुठं आहेत.सारं काही सरकारी खाजगी होत आहे.खाजगीकरणात कुणालाही पर्मनंट नोकरीची शाश्वती राहिली नाही.गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.महागाईने आस्मान गाठले आहे.आणि दुसरीकडे आर्थिक संकटात लोकं सापडली आहेत.ज्यांना आरक्षण आहे.त्यांना लाभ मिळत नाही.नवीन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही.राज्यकर्त्यांनी गुंतागुंती वाढवून ठेवल्या आहेत.जातीवर जाती,एका धर्माविरुद्ध दुसरा धर्माची माणसे लढायला उभी केली आहेत.जातीय आणि धार्मिक द्वेषाला राजकीय खतपाणी घातले जाते आहे.भडक, प्रक्षोभक,हिंसक भाषणे करणारांना सरकारच वाचवत आहे.या सर्व परिस्थितीत विकास कुठं आहे.त्या विकासाला निवडणुकीतील भाषणे, लोकसभा, विधानसभा अधिवेशनातील विकासाचे भाषणे, आणि खर्च केलेली कोट्यावधी रुपयांची भाषणे, कोट्यवधी रुपयांची तरतूद, मंजुरीची आकडेवारी पाहिली तर विकास पळत असावा असे वाटते पण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे,अपु-या योजना,कामात झालेले भ्रष्टाचार आणि अनेक ठिकाणी तर काम न करताच उचलले गेलेले बीले यामुळे ठप्प झालेला विकास दिसतो.लिहण्या सारखं खूप आहे.पण हल्ली लिहायचं कुणी ? कोण लिहिणार?हा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण पत्रकारिता जशी महापुषांना अपेक्षित होती.आणि पुस्तकांतून पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते तशी राहिली नाही हे कटू सत्य आहे.आणि कुणी निर्भीड आणि लोक पत्रकारिता प्रामाणिक पणे करत असेल तर त्याला एक तर बाहेर काढले जाते किंवा जाणीवपूर्वक डावलले जाते.आणि चमचेगिरी व पुढं पुढं करणारांना तारले जाते.मग त्याला दोन ओळीची बातमीही नीट लिहिता नाही आली तरी चालते.सायं.दैनिक परळी बुलेटीन मात्र निश्चित लोकपत्रकारितेतील एक खारीचा वाटा आहे.हे वर्धापन दिनाच्या निमित्ताने नमूद करतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने