परळी औष्णिक विद्युत केंद्रात नवीन संच क्रमांक 9 ची उभारणी होणारच; : धनंजय मुंडे

परळी औष्णिक विद्युत केंद्रात नवीन  संच क्रमांक 9 ची उभारणी होणारच; : धनंजय मुंडे 

मुंबई (प्रतिनिधी) -  मराठवाड्याचे  भूषण व परळीची अर्थवाहिनी असलेल्या  परळी तालुक्यातील नवीन औष्णिक विद्युत केंद्रात नविन संच क्रमांक ९ हा यापूर्वीच मंजूर झालेला आहे . या संचाची उभारणी रद्द होणार नाही ,हा संच उभारावा यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करणार आहोत. असे राज्याचे कृषीमंत्री मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की,  संच क्रमांक नऊ उभारण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून हा संच उभारणीस मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली असून यासंदर्भात लवकरच श्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

     मागील छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली होती. याबाबत महानिर्मितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर पाणी, कोळसा इत्यादी गोष्टींची उपलब्धता नाही असा अभिप्राय महानिर्मितीच्या स्थानिक प्रशासनाने राज्य शासनास सादर केल्यामुळे नव्या संचाच्या उभारणीस अडचणी निर्माण होतील  अशी शंका निर्माण झाली
आहे.

    मात्र परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात पासून जवळ असलेल्या खडका बंधाऱ्यांमध्ये माजलगाव धरण व जायकवाडी धरण येथून पाण्याची कमतरता भासल्यास पाण्याचे आवर्तन घेता येते आणि असा प्रसंग पाच ते सहा वर्षात कधीतरी एखाद्यावेळी येतो मात्र पाण्याची कमी भासत नाही. 

    त्याचबरोबर नाशिक, भुसावळ, पारस ही औष्णिक केंद्र देखील कोळसा खानीपासून दूरच आहेत, मात्र इलेक्ट्रिक रेल्वेमुळे तिथे कोळसा लवकर पोहोचतो त्याच पद्धतीने परळीत देखील डबल ट्रॅक चे काम सुरू असून परळीत देखील रेल्वेने कोळसा पोहोचण्यास कोणतीही अडचण नाही. त्याचबरोबर परळी येथे औष्णिक विद्युत केंद्रात नवीन प्रकल्प उभारण्यासाठी वेगळी जागा विकत घेण्याची गरज नाही तसेच मनुष्यबळ उपलब्धी व कर्मचाऱ्यांच्या वसाहती हे देखील औष्णिक विद्युत केंद्र परिसरातच असल्याने त्या देखील जमेच्या बाजू असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दोनच दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देखील धनंजय मुंडे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्रात नवव्या संचाच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर सकारात्मक निर्माण घेऊ असाही शब्द दिला होता. त्यालाच अनुसरून धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

दरम्यान परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. 1 ते 5 यांचे आयुर्मान संपल्याने ते स्क्रॅप केले असून त्याजागी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतही शासन सकारात्मक आहे. नव्याने संच उभारणीसाठी स्थानिक प्रशासनाने काहीही अभिप्राय दिलेला असला तरीही आपण राज्य शासन स्तरावर 9वा संच उभारन्यास मंजुरी मिळवणार आहोत, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने