आता खरा गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिसांना तिसरा डोळा मिळाला - ना.धनंजय मुंडे
चोर आणि समाजकंटकावर पोलिसांची 24 तास राहणार करडी नजर
परळी प्रतिनिधी. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता खरा गुन्हेगार शोधणे पोलिसांना सहज सोपे होणार आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते परळी शहर पोलीस स्टेशन येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान चोर आणि समाजकंटक यांच्यावर आता पोलिसांची 24 तास करडी नजर असणार आहे.
शहरावर अत्यंत प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं निगराणी असणार आहे. जसा शंकराचा तिसरा डोळा आहे. तो कोणाला कधी दिसला असेल नसेल परंतु पोलिसांचा तिसरा डोळा मात्र आज पासून परळी शहरात 35 ठिकाणी 133 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्णपणे दिसणार आहे. यामुळे आणि शहरातील गुन्हेगारीला चाप बसणार असून अनेकांना गुन्ह्यात तपासासाठी विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. परंतु आता सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र बसवल्याने खरा गुन्हेगार शोधण्यासाठी ही प्रणाली फार उपयुक्त ठरणार आहे. कुणीही काही केलं तरी सुटू शकणार नाही. नागरिकांनीही आपले कर्तव्य पार पाडावीत असे आवाहनही पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केले.
या कार्यक्रमास बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले, परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, नायब तहसीलदार बी एल रुपनर, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि जाधव आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
याप्रसंगी उद्घाटन बोलताना कृषिमंत्री म्हणाले की परळी शहर हे तीन शक्तींचे केंद्र असून ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र , अधिक उत्पन्न देणारे दक्षिण मध्य रेल्वेचे परळी रेल्वे स्थानक आणि ज्योतिर्लिंग वैद्यनाथ यामुळे या शहरात भाविक भक्तांचे मोठा राबता असतो. शहरात येणारे भाविक त्यांचे वाहन आणि त्यांच्या जखमेच्या वस्तूची निगराणी यासोबतच शहरातील गुन्हेगारी वृत्तीवर या नवीन यंत्रणेतून पोलिसांना नियंत्रण मिळवणे शक्य होईल. नागरिकांनीही या नवनवीन उपलब्ध होणाऱ्या सोयी बरोबरच आपल्या कर्तव्याची ही जाणीव ठेवावी आणि वाहने पार करताना रस्त्यावर थुंकताना याचा विचार करावा की आता आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहोत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी तर मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर केले. या कार्यक्रमास परळी शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.
..............................................
सीसीटीव्ही यंत्रणेवर ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा खर्च करण्यात आला आहे. शहरातील चौकाचौकात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. १३३ कॅमेरे असून यात वाहनाची नंबर प्लेट डिटेक्ट करण्याची ही सुविधा आहे. आपत्कालीन स्थितीत शहरात काही अनुचित प्रकार घडले तर याचा तपास कामात मोठा फायदा पोलीस यंत्रणेला होणार आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात झालेली जाळपोळ, अनेक नेत्याच्या घरावरील हल्ले किंवा वाढती गुन्हेगारी, वाहन चोरी या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे आय. जी. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी परळीतील पत्रकारांशी संवाद साधला होता. शहरातील ज्येष्ठ पत्रकारांनी बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी बैठकीत केली होती. त्यांनीही यावर तात्काळ कारवाई करून सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्याही आता ‘विघ्नहर्ता’ ठरू शकतो. जसा शंकराचा तिसरा डोळा आहे. तसाच आता पोलिसांचाही परळी शहरावर 133 सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून तिसरा डोळा असणार आहे.
हे चौक होणार नजरकैद
छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाथ चित्रमंदिर रस्ता, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसर, इटके कॉर्नर चौक, राणी लक्ष्मीबाई टावर चौक, मोढा मार्केट, मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक, महात्मा बसवेश्वर चौक, वैद्यनाथ मंदिर परिसर आदीसह परळी शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या रस्त्यावरही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
गुन्हे रोखणे हाच उद्देश
सीसीटीव्ही कॅमेरांच्या बाबतीत गुन्हे रोखणे हा प्रमुख उद्देश पोलिस प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवला आहे. वाहतूक यंत्रणा सुरळीत ठेवणे, छेडखानी, मोर्चे, आंदोलन यावेळी कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारे आंदोलक, चेन स्नॅचिंग, चोरी, हाणामारी, बेदरकारपणे वाहन चालवणे या घटनांवर कॅमेरांची विशेष नजर राहणार आहे. यामुळे गुन्हेगारीला नक्कीच आळा बसणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा