जायकवाडीतून परळी वीज निर्मिती केंद्रासाठी येणारे ७० टक्के पाणी जाते वाया सिंचन विभागाने बिल दिले १९७ कोटी पण अवैध पाणी उपशावर कारवाई आणि दुरुस्तीचे काय?

जायकवाडीतून परळी वीज निर्मिती केंद्रासाठी येणारे ७० टक्के पाणी जाते वाया

सिंचन विभागाने बिल दिले १९७ कोटी पण  अवैध पाणी उपशावर कारवाई आणि दुरुस्तीचे काय? 

परळी /प्रतिनिधी

   परळी वीज निर्मिती केंद्रासाठी आवश्यक असणारे पाणी जायकवाडी धरणातून खडका येथील बंधाऱ्यात येईपर्यंत कॅनॉलच्या दुरवस्थेमुळे ,जमिनीत पाणी झिरपल्यामुळे  ७० टक्के पाणी वाया जाते तर केवळ ३० टक्के पाणी साठा खडक येथील बंधाऱ्यात पोहचतो. असे असतानाही शासनाच्या  सिंचन विभागाने मात्र १९७ कोटी रुपये बिल देऊन वीज निर्मिती केंद्राला आर्थिक संकटात टाकले आहे. जेवढे बिल दिले जाते तेवढे पाणीच मिळत नसल्याने एक प्रकारे वीज निर्मिती केंद्रावर अन्यायच म्हणावा लागेल. सदरील बिल चुकीचे अदा केले असल्याचेही मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे . 
   जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून दि.२० मार्च रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास १०० क्यूसेकने पाणी सोडण्यातआले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा वेग वाढवला जाणार असून जवळजवळ २० दलघमी पाणी खडका बंधाऱ्यात १ एप्रिलपर्यंत सोडण्यात येणार आहे.
    या बाबत अधिक माहिती अशी की, जायकवाडी येथून परळी वीज निर्मिती केंद्रासाठी पाणीपुरवठा करणारे खडका बंधाऱ्यापर्यंत पाटाद्वारे पाणी आणले जाते. परंतु या पाटाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. पाणी जमिनीमध्ये मुरू नये म्हणून पाटात काँक्रीटिंग असते. जागोजागी ही काँक्रीटिंगच उखडली गेलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीत पाणी मुरत आहे. तसेच सोनपेठ तालुक्यातील सईखेडा येथील (ट्वेंटीवन) एका साखर कारखान्याने मोठ्या प्रमाणात याच पाटातून पाणी उपसा केल्याचा फटका परळी औष्णिक विद्युत केंद्राला बसत आहे. या कारखान्याला कसल्याच प्रकारची कार्यवाही नोटीस सिंचन विभागाकडून गेली नाही.
   या बरोबरच प्रत्येक गावामधून शेतकऱ्यांनी पाटात मोटारी बसवून अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. अश्या मोटारींची संख्या ३५०० ते चार हजाराच्या घरात असल्याचे कळते. सध्या मराठवाड्यात उन्हाची तीव्रता प्रचंड आहे. या कडक उन्हामुळे जायकवाडीतून पाणी सोडल्यानंतर बाष्पीभवनामुळे पुन्हा पाणी कमी होते. दरम्यान सिंचन विभागाने जानेवारी २०२४ मध्ये परळी निर्मिती केंद्राला 40 mm3  पाण्याचे १९७ कोटी रु दंडासहित बिल आकारले तर  परभणी जिल्ह्यातील सोनपेठ  तालुक्यातील  किनोळा या ठिकाणाहून कुडूळ, हममदापूर, रामेटाकळी, थार मार्गे खडका बंधारा २५  कि.मी अंतर आहे .पाणी पुरवठा अंतर्गत २० मार्च ते १ एप्रिल पर्यन्त पाणी सोडले जाणार आहे .
    या साठी 10 mm3 पाण्याचे पुन्हा ५० कोटी रु बिल आकारले जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त समजते. प्रत्येक्षात मात्र परळी वीज निर्मिती केंद्राच्या खडका बंधाऱ्यात 3.5 mm3 पाणी साठा पोहचला आहे. त्यामुळे सिंचन विभागाच्या या अनागोंदी कारभारास जवाबदार असणाऱ्या  कार्यकारी अभियंत्यांवर मुख्य अभियंता कार्यवाही करणार का? तसेच परळी वीज निर्मिती केंद्राची होणारी लूट थांबेल का ?असा सवाल निर्माण होत आहे. संबंधित कार्यकारी अभियंता मयुरा जोशी यांच्याशी अवैध पाणी उपसावर काही  कार्यवाही करणार आहात का? दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी  उत्तर देण्यास टाळाटाळ केली.
   सद्यस्थीतीत परळी औष्णिक वीज केंद्रात 23मार्च 2024 पासून पाणी सोडण्यात आले आहे. तसेच असे निदर्शनात येते की, जायकवाडी ते किन्होळा ज्या 4000 मोटरी आहेत त्यावर सिंचन विभागाचे मुख्यअभियंता व कार्यकारी अभियंता कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. सर्व अवैध पाणी उपसा भार परळी औष्णिक वीज केंद्रासच उचलावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने