परळीत मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर डागली तोफ

परळीत मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर डागली तोफ


परळी प्रतिनिधी.     मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी परळीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली.मराठा समाज बांधवांवर दाखल करण्यात येत असलेले खोटे गुन्हे थांबवावेत अशी विनंती मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना केली .नाहीतर मराठा समाजाची लाट तुमच्या अंगावर येईल असा गर्भित इशारा परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत जरांगे यांनी दिला. दरम्यान 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे समाजाची अंतिम बैठक होणार असल्याचेही ते म्हणाले.
    काल दिनांक 20 मार्च रोजी रात्री मोंढा मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीला मनोज जरांगे पाटील नऊ वाजता दाखल झाले .यावेळी त्यांचे मराठा समाजातील पाच मुलींच्या वतीने फुले उधळून स्वागत करण्यात आले .यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की परळीकरांनी संवाद बैठक नाहीतर महाराष्ट्रातील जनतेची बैठक लावल्याचे उपस्थित गर्दीवरून दिसत आहे.
      सभेला सुरुवात करताना जरांगे पाटील यांनी न्यायालयाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे बोलत असल्याचे सांगितले .आता यापुढे मराठा समाजाने जिथे फायदा नाही तिथे काम करायचे नाही असे ठरवले पाहिजे .मराठा समाजाच्या कार्यकर्त्यावर होत असलेल्या खोट्या गुन्ह्याबाबत बोलताना ते म्हणाले की ,हे गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय होऊ शकत नाही .बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचाही त्यांनी याप्रसंगी नाव न घेता उल्लेख केला कदाचित पालकमंत्र्यांना हे सर्व माहीत असावे किंवा त्यांच्या संगणमताने तर गुन्हे दाखल होत नाहीत ना असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
    पुढे बोलताना ते म्हणाले की सरकारने जो शब्द दिला तो पाळला नाही दहा टक्के आरक्षण समाजाला मान्य नसताना ते दिले .सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही .परंतु एक लक्षात ठेवा आचारसंहिता संपली की पुन्हा गाठ आमच्याशी आहे .मी समाजाला माय
बाप मानतो त्यामुळे स्वार्थासाठी समाजाशी कधी गद्दारी करणार नाही .सरकारला आपला आक्रोश कळत नाही जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी .समाजाची ही एकजुट अशीच कायम ठेवा आपणाला न्यायाचा आणि सामाजिक लढा जिंकायचा आहे.
    दरम्यान 24 मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक होत असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल .तर लवकरच 900  एकर वर मराठ्यांची भव्य सभा होईल असे हे ते म्हणाले लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रत्येक गावातून फॉर्म भरणे हा समाजाचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान करा आणि ते कुणाला करायचे हे 24 तारखेला सांगतो असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान या संवाद बैठकीला महिला व पुरुषांची प्रचंड गर्दी होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने