माणसाला माणसाशी जोडणारा धम्म म्हणजे बुद्ध धम्म : भंते धम्मशील

माणसाला माणसाशी जोडणारा धम्म म्हणजे बुद्ध धम्म : भंते धम्मशील

सिरसाळा ( प्रतिनिधी)     माणसाला माणसाशी जोडणारा धम्म म्हणजे बुद्ध धम्म होय असे प्रतिपादन भन्ते धम्मशील यांनी केले ते भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार, सिरसाळा येथे आयोजित कार्यक्रमात धम्मदेशना देतांना बोलत होते.
    या कार्यक्रमाचे आयोजन यशोधरा महिला मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, सिरसाळा यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी धम्मदेशना करताना भंते धम्मशील म्हणाले की, “माणसाला माणसाशी जोडणारा धम्म म्हणजे बुद्ध धम्म होय.” अधम्मामुळे धर्म, जात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात भेदभाव निर्माण झाला. मात्र बुद्ध धम्मात कोणीही उच्च-नीच नाही. बुद्धांचा धम्म मानवाला दुःखमुक्तीच्या मार्गावर घेऊन जाणारा असून प्रत्येक माणसाने समानतेच्या भावनेने जगले पाहिजे.
पुढे ते म्हणाले की, माणूसच माणसाच्या सुख-दुःखाचे कारण आहे; प्राणी माणसाची निंदा करत नाही किंवा जाणूनबुजून दुःख देत नाही. जे लोक इतर माणसांशी माणुसकीने वागतात ते सुखी राहतात, तर माणुसकीचा व्यवहार न करणाऱ्यांच्या जीवनात दुःख निर्माण होते. चांगले बोलणे सुख देते, तर वाईट शब्द दुसऱ्याच्या मनाला दुःख देतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाणीवर आणि आचरणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
   भंतेजींनी राजा प्रसेनजित यांना बुद्धांनी दिलेल्या उपदेशाचा संदर्भ देत कर्माच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. कर्म कधीही साथ सोडत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कृतींचा विचार करून जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला. सर्व प्राणिमात्रांवर दया करा, हृदयात करुणा ठेवा आणि सदाचरणाचे महत्त्व ओळखा. धम्माचे आचरण करणारा मनुष्य शांततेने व समाधानाने जीवन जगतो, असेही त्यांनी सांगितले.
“जन्मगावापासून मरणगावाकडे जाताना माणसाला आयुष्यात थोडा विसावा हवा; हा विसावा धम्माच्या आचरणातून मिळतो,” असे सांगत भंते धम्मशील यांनी धम्म हा केवळ विचार नसून तो प्रत्यक्ष आचरणाचा मार्ग असल्याचे स्पष्ट केले.
   यावेळी उपासिका आयु. लता सुभाष चोपडे यांनी उपस्थित उपासक-उपासिकांसाठी श्रद्धापूर्वक खीरदान केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोधाचार्य साहेबराव किरवले यांनी केले. यावेळी आयु चांगदेव तरकसे, आयु वाघमारे साहेब (अंबाजोगाई) कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच परिसरातील उपासक-उपासिका, महिला मंडळाच्या सदस्यांसह धम्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्धांच्या समता, करुणा, मैत्री आणि सदाचरणाच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने