राख सुध्दा खाता येते हे थर्मलच्या अधिका- यांनी दाखवून दिले 45 कोटींच्या भ्रष्टाचारात मुख्य अभियंता, अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी - मिलिंद घाडगे

राख सुध्दा खाता येते हे थर्मलच्या अधिका- यांनी दाखवून दिले 



45 कोटींच्या भ्रष्टाचारात  मुख्य अभियंता, अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी - मिलिंद घाडगे 




परळी प्रतिनिधी.    परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून टेंडर प्रक्रिया मध्ये गैरप्रकार करून मुख्य अभियंता सुनील इंगळे, दाऊतपूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक तसेच राख हातळणी विभागातील अधिकारी यांनी संगनमताने शासनाचा सुमारे 45 कोटी रुपयांचा महसूल चोरी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला असुन याप्रकरणी सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 8 सप्टेंबर 2026 रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
    याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मिलिंद घाडगे यांनी म्हटले आहे की, परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे वतीने 2023 मध्ये 353 रुपये प्रती टन प्रमाणे 80 टक्के राखेचे टेंडर काढण्यात आले.एक टिप्पर 11 टन दाखविण्यात आले.प्रत्यक्षात राखेच्या तळ्यातून 46 टन वजनाचे टिप्पर बाहेर पडत होते. 2023 मध्ये शासनाचे 14 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.
    2026 मध्ये 60 टक्के टेंडर प्रक्रिया 892 रुपये प्रती टन प्रमाणे काढण्यात आले.जवळपास 10 हजार गेटपास देण्यात आले. कागदावर 14 टन प्रत्यक्षात 46 टन इथेही एका टिप्परमागे 46  टन अतिरिक्त राख बाहेर जात होती.यामध्ये शासनाला 28 कोटी रुपयांचा फटका बसला.तर 2026 मध्ये वीज निर्मिती केंद्राने दाऊतपूर ग्रामपंचायतला 177 रुपये प्रती टनाने राख उचलण्यास परवानगी दिली. ग्रामपंचायतने जवळपास 60 हजार मेट्रिक टन राख उचलली.एका गेटपासला 14 टनाची परवानगी होती परंतू प्रत्यक्षात 46 टन राख टिप्परमधून बाहेर जात होती.इथे राज्य सरकारला 8 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
    दिनांक 22 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे.2026 मध्ये जी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली ती अतिशय घाई घाईने राबविण्यात आली आहे.मुख्य अभियंता सुनील इंगळे,राख हाताळणी विभागाचे प्रमुख अरुण गिते, दाऊतपूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने शासनाचा महसूल बुडविल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,चोरी केलेला महसूल शासनाने वसुल करावा यासह विविध मागण्यांसाठी दिनांक 8 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी म्हटले आहे. राख सुध्दा खाता येते हे परळी वीज निर्मिती केंद्राच्या अधिका-यांनी दाखवून दिले आहे.
    दरम्यान यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने याच प्रश्नावर परळीत रस्ता रोको आंदोलन व परळी पंचायत समिती समोर अमरण उपोषण करण्यात आले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने