मुलांनो आई वडिलांना समजुन घ्या
छत्रपती संभाजी नगर मधील वाळुंज एम.आय.डी.सी.परिसरातील खावड्या डोंगरावर मन सुन्न करणारी घटना घडली.आई, वडील आपणास खर्चायला पैसे देत नाहीत, मोबाईल घेतलेला त्याचा हप्ता बाउन्स झाला याचा राग मनात धरून तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.ही घटना कळताच आई ,वडील, पोलीस, परिसरातील नागरिक सारे जमा झाले.त्याची विनवणी करू लागले.
सुमारे दोन अडीच तास समजावण्याचा प्रयत्न सुरू होता.कसे बसे वडील तरुणाच्या जवळ पोहचले पण मुलगा डोंगराच्या कडेला उभा होता.त्याला वाचवतांना दोघेही खाली कोसळले.आपला मुलगा आणि पती कोसळल्याचे पाहुन आईनेही डोंगरावरून खाली उडी घेतली.क्षणात चांदवडे परिवारातील तिघांचा करुण अंत झाला.
या निमित्ताने माझ्या तमाम तरुण, तरुणी, विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना आवाहन आहे.आपल्या आई वडिलांना समजुन घ्या.तुम्हीच तुमच्या आई वडिलांचे विश्व असतात.तुमच्या साठी दिवस रात्र आई वडील कष्ट करीत असतात.तुमचे मित्र कसे आहेत.ते गरीब आहेत की श्रीमंत आहेत.त्यांच्याकडे काय आहे आणि काय नाही हे पाहू नका. तुमच्या आवडी निवडी,कपडा, लत्ता, दवाखाना,शिक्षण, आपल्या मुलांना काहीच कमी पडू नये हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते.
आई - वडील जिवाचे रान करून आपल्या मुलांना सांभाळत असतात.तुम्ही कितीही मोठे व्हा,तुमची लग्न होऊ द्या, तुम्हाला मुलं बाळ होऊ द्या,माझे नातु म्हणून नातवांना अंगा खांद्यावर खेळवतात.नातवांनाही तोच जीव लावतात जो तुम्हाला लावला होता.रागा रागात आपण एखादा टोकाचा निर्णय घेतो आणि बरे वाईट करून घेतो.
मुलगा किंवा मुलगी म्हणून आपली आई वडिलांकडून खूप अपेक्षा असतात.इच्छा असतात तशा आई वडिलांच्याही असतात.ते बोलत नाहीत.रडत नाहीत पण आतल्या आत निश्चित झुरत असतात.खंगत असतात.ते आई वडिलांचे झुरणे आणि खंगणे आपणाला दिसत नसते. एखादी गोष्ट तुम्ही मागितली आणि ती पूर्ण झाली नाही म्हणजे आई वडील आपल्यावर प्रेमच करीत नाहीत असा अर्थ लगेच काढू नका.तुमच्या मित्रांच्या आई वडीलांसारखी कमाई नसेल.पण तुमच्यावर प्रेम नाही.तुमचे हट्ट पुरवत नाहीत असे नाही. तुमच्या पेक्षा आई वडीलांसाठी काहीच मोठे नसते.
थोडंसं जेंव्हा आपण आईच्या कुशीतून जन्मलेले असता,आपला जन्म झाल्यानंतर पासूनचा प्रवास फक्त डोळ्यासमोर आणा. जन्मापासून आपण तरुण होई पर्यंत आपणाला कोणी वाढविले आणि मोठे केले हे पहा.कशा परिस्थितीत केले ते पहा.बालपण ते तारुण्य हा एका दिवसाचा प्रवास नसतो.मग लक्षात येईल आई वडील आपल्यासाठी काय असतात.ज्या वयात तुम्ही आई वडीलांचा आधार व्हायचे असते त्या वयात आई वडीलांना काही देऊ शकला नाहीत तर देऊ नका किमान न संपणा-या वेदना देऊ नका.अरे लाथ मारीन तिथे पाणी काढीन ही हिंमत ठेवा. फार लवकर निराश, नाराज होत जाऊ नका.
जगात अशक्य असे काहीच नाही.जे आपणाला मिळाले नाही किंवा आई वडिलांच्या परिस्थिती मुळे मिळू शकले नाही म्हणून आई वडिलांना दोष देत बसू नका.आणि आत्महत्या सारखा मुर्खपणा करू नका.आपल्या कष्टाने ते सर्व मिळवा जे तुम्हाला पाहिजे.
रानबा गायकवाड

टिप्पणी पोस्ट करा