भव्य धम्म रॅलीतील बुद्धम शरणम् गच़्छामीच्या निनादात परळी झाली बौध्दमय
सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म वाढविलाच शिवाय आपल्या मुलांना लोककल्याणाचा वारसा दिला - भन्ते मोग्गलायन
परळी प्रतिनिधी. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी भारतातच नाही तर जगात बौद्ध धम्म वाढविला तसेच आपल्या मुलांना संपत्तीचा वारसा न देता लोककल्याणाचा वारसा दिला असे भन्ते मोग्गलायन यांनी सांगितले.ते परळी येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुद्ध जयंतीनिमित्त धम्मदेशनेत बोलत होते. शहरातून तथागत गौतम बुद्ध यांच्या 2570 व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य धम्म रॅलीतील बुद्धम शरणम् गच़्छामीच्या निनादात परळी शहर बौद्धमय झाल्याचे दिसून येत होते.
रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील मैदानात सायंकाळी सात वाजता भन्ते मोग्गलायन यांची धम्मदेशना संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे परळी तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमारे होते.भन्ते मोग्गलायन म्हणाले की,बुध्दांच्या आयुष्यात पोर्णिमेचे अत्यंत महत्व आहे.बुध्दांनी अखिल विश्वाला दुःख मुक्तीचा संदेश दिला आहे.विहारात गेल्या नंतर शरीराबरोबर मनही विहारात असले पाहिजे.तरच सदधम्म श्रवण करता येतो.सुख प्राप्त करायचे असेल तर सदधम्म जाणला पाहिजे.आपण धम्म समजून घेतला नाही तर आपल्या मुलांना कसा समजेल.
ज्यांनी बुध्दाच्या प्रती श्रध्दा अर्पण केली ते दुःख मुक्त झाले.अर्हन्त पावले.बुध्दांनी दुःखाचे कारण अहंकार सांगितले आहे.पंचशील माणसाच्या सुखाचे कारण आहे.पंचशील , चार आर्य सत्य,जो दानपारिमाता पाळतो तो आपल्या आयुष्यात सुखी होतो.बाबासाहेबांनी आपणाला 14 आक्टोबर 1956 ला 22 प्रतिज्ञा देऊन धम्मदिक्षा दिली.त्यामुळे बौद्ध उपासकांनी बावीस प्रतिज्ञा यांचे पालन केले पाहिजे. आपल्यातील अंधश्रद्धा ही आपल्या गरीबी आणि अज्ञानाचे कारण आहे.जगात सर्व काही अनित्य आहे.नष्ट होणारे आहे.बाबासाहेबांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.म्हणून बाबासाहेबांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे.त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असले पाहिजे.
तसेच पुढे बोलताना भन्ते मोग्गलायन म्हणाले की,जगात सम्राट अशोक हा एकमेव राजा झाला ज्याने आपल्या मुलांना संपत्तीचा वारसा न देता लोककल्याणाचा वारसा दिला.प्रत्येक घरातील एक व्यक्ती समता सैनिक दलासाठी दिला पाहिजे.भन्ते मोग्गलायन यांच्या धम्मदेशनेपूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून सायंकाळी 6 वाजता भव्य धम्म रॅली निघाली.सजविलेल्या रथातून तथागत गौतम बुद्ध यांची मुर्ती ठेवण्यात आली होती.बुध्दम शरणम् गच्छामी,धम्मम शरणम् गच्छामी,संघम शरणम् गच्छामीच्या सुरात बौद्ध उपासक, उपासिका हातात पंचशील ध्वज घेऊन चालत होते.हातातील दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष हनुमंत वाघमारे यांनी केले.प्रस्ताविक समता सैनिक दलाचे विभागीय संरक्षण प्रमुख डॉ स्वप्निल महाळंगीकर यांनी केले.उत्कृष्ठ सुत्रसंचलन बचाटे यांनी तर आभारप्रदर्शन प्रजावतीताई कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा