सावकाराच्या छळाला कंटाळून मातंग समाजाच्या मजुराची आत्महत्या ॲट्रॉसिटी ॲक्टसह एकावर गुन्हा दाखल

सावकाराच्या छळाला कंटाळून मातंग समाजाच्या मजुराची आत्महत्या 


ॲट्रॉसिटी ॲक्टसह एकावर  गुन्हा दाखल 

परळी (प्रतिनिधी).  

        सावकाराच्या जातीय  आणि मानसिक छळाला कंटाळून सावकाराच्याच पत्र्याच्या शेडमध्ये मातंग समाजाच्या मजुराने आत्महत्या केल्याची घटना परळी तालुक्यातील घडली आहे. याप्रकरणी मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलिसांनी आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी  ॲक्टसह गुन्हा दाखल केला आहे.
     याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुंडलीक पिराजी वैराळ (रा. पौळ पिंपरी, ता. परळी वैजनाथ) यांनी दि. 20 मार्च 2026 रोजी रात्री 11 वा. ते दि. 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मयताची पत्नी शांताबाई कुंडलीक वैराळ (वय 55, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108,352 , अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा 1989 अन्वये 3(1)(r),3(1)(s),3(2),3(V) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
   फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी हा पैशाच्या वादातून वारंवार जातीय शिवीगाळ करून दमदाटी करत होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून व नैराश्यात जाऊन कुंडलीक वैराळ यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नोंद दि. 22 मार्च रोजी करण्यात आली असून, पुढील तपास माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने