एक हात मदतीचा,रा.ब.काळे शाळेचा आदर्श उपक्रम विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी जमा केली मदत

एक हात मदतीचा,रा.ब.काळे शाळेचा आदर्श उपक्रम 


विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी जमा केली मदत


 सातारा.           शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श पुढे नेताना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या रा.ब. काळे जीवन शिक्षण  मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांचा अपघात झाल्याचे कळताच शाळेतील विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलत सदर विद्यार्थिनीला  आर्थिक मदत केली. एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत जमा झालेली रक्कम मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांनी अपघातग्रस्त पालकांच्या स्वाधीन केली.
    दोन दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता . यवतेश्वर घाटात शाळेचे एक पालक त्यांच्या दोन्ही मुलांसह रस्त्यावर फरफटत गेले व त्यांना बराच मुक्का मार लागला, त्यांना दुखापत झाली. अपघात जास्त पालकांची परिस्थितीही जेमतेम होती. त्यांची मुलगी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या सातारा येथील रा.ब. काळे जीवन शिक्षण विद्या मंदिरात शिक्षण घेत आहे. अपघाताचे  वार्ता शाळेचे मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना कळाली आणि त्यांनी शाळेत एक हात मदतीचा उपक्रम राबविला.
    या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेला येताना आपापल्या घरून जमेल तशी रक्कम घेऊन आले.  रक्कम घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनी गेटच्या समोरच पिशवी घेऊन उभी करण्यात आली. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपल्या जवळील पैसे त्या पिशवीत जमा केले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 10,20 रुपयांची मदत जमा केली. अवघ्या  तासाभरात अडीच हजार रुपयांची मदत गोळा झाली. जमा झालेले २५२०/- रु. या अपघातग्रस्त विद्यार्थीनीला घरी जाऊन दिले. अपघातग्रस्त विद्यार्थिनीला मदत तर मिळालीच, पण अशावेळी मदत करायची असते हा संस्कार देखील सर्व विद्यार्थ्यांवर झाला. शाळेने राबवलेल्या या आदर्श उपक्रमाचे सातारा जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने