शहिद भगतसिंग अभ्यासू आणि लढाऊ व्यक्तिमत्त्व

 शहिद भगतसिंग अभ्यासू आणि लढाऊ व्यक्तिमत्त्व

    भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करावाच लागेल, हे माहित असुनही आणि हा त्याग केला तरच भारताचे स्वातंत्र्य लवकर मिळेल हा स्पष्ट अंदाज असणारे, देशभक्त शहिद भगतसिंग यांची आज जयंती आहे. शहिद भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी झाला, त्यानंतर त्यांना 23 मार्च 1931 रोजी इंग्रजांनी ठरलेल्या तारखेच्या आगोदर एक दिवस फासावर चढवले, फासावर जात असताना हसत हसत मृत्यूला कवटाळणारे शहिद भगतसिंग स्वातंत्र्य लढ्यातील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत, त्यांनी आपल्या सुफी अंबाप्रसाद यांच्याबद्दल लिहिलेल्या एका लेखात "आपल्या भारत देशाला, या देशासाठी लढलेल्या आणि खूप मोठा त्याग केलेल्या नररत्नांचा विसर पाडलेला आहे, आपण कृतघ्न आहोत" असे शहिद भगतसिंग यांनी म्हटले होते,
      या देशातील सामाजिक परिस्थिती अशी आहे, असे माहिती असूनही हा अवघा 23 वर्ष 5 महिने 23 दिवसांचे जिवन जगण्यासाठी मिळालेला अभ्यासू आणि लढाऊ तरूण, आपल्याला कोणी आठवावे किंवा आपण दिलेल्या हौतात्म्याबद्दल नंतर स्तुती गावी, अशी कुठलीच मानसिकता न बाळगता, फक्त आणि फक्त या भारत देशातील लोकांचे, विशेषतः कष्टकऱ्यांचे जीवन सुखी संपन्न आणि स्वाभिमानाने जगण्यासारखे बनावे, हा भारत देश स्वर्गाच्या कल्पनेसारखा सुंदर बनावायचा या उद्देशासाठी आपल्या जीवनाचा त्याग करत असताना, फक्त दहा वर्ष सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारे आणि स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय, कृतिशिल संघटनेचा सर्वांच्या गळ्यातला ताईत बनलेले, अवघ्या सात वर्षातच संघटन कौशल्य व विचार प्रगल्भतेचे उदाहरण घालून देणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांनी कशा पद्धतीने आपल्या जिवनातील हा काळ घालवला असेल याचा आपण अंदाज करू शकतो.
   शहीद भगतसिंग एके ठिकाणी म्हणतात, " आज आमच्या देशाला सर्वात जास्त गरज कशाची असेल तर ती आहे व्यावसायिक क्रांतिकारकांची ! " म्हणजे क्रांती करणे हाच आमचा व्यवसाय आहे, असे मानणारे तरुण या देशात निर्माण झाले पाहिजेत, या देशातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवणे हे आमचे कर्तव्य आहे, असे स्पष्टपणे न्यायालयात सांगणारे शहीद भगतसिंग आणि त्यांचे सहकारी फक्त आपल्या भारत देशातील क्रांतिकारकांनाच नाही तर जगभरातील क्रांतिकारकांना अभ्यासून त्यांनी ज्याप्रमाणे जगात क्रांत्या गेल्या त्याप्रमाणे या देशात क्रांती करण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे होते.
   शहीद भगतसिंग यांचा अभ्यास आणि त्यांच्या लिखाणाचा विचार केला असता, आपण स्तंभित होऊन जातो, शहीद भगतसिंग यांनी जवळपास त्यांच्या पूर्वी ज्या क्रांतिकारकांनी वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला होता, त्या क्रांतिकारकांच्या जीवनविषयक माहितीचा अभ्यास केला होता, स्वतः भगतसिंग यांनी जवळपास 30 ते 35 क्रांतिकारकांबद्दल लेख लिहिलेले आहेत, रशियामधील क्रांतिकारक वातावरणामध्ये तेथील युवक आणि विद्यार्थ्यांनी बजावलेली भूमिका त्याचाही अभ्यास शहीद भगतसिंग यांनी केला होता, त्याबाबतचा लेख सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे, शहीद भगतसिंग यांनी या देशातील युवकांना उद्देशून एक संदेश दिलेला आहे, जो शहीद भगतसिंग यांचा युवकांना संदेश या मथळ्याखालीच प्रसिद्ध आहे,
     शहीद भगतसिंग यांनी विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र आवाहन केलेले आहे, ते सुद्धा त्या काळामध्ये त्यांनी लिहून प्रकाशित केलेले आजही उपलब्ध आहे, भगतसिंग यांनी लिहिलेली वेगवेगळी पत्रे, कोर्टासमोर दिलेल्या जबानी यामधून एक अभ्यासपूर्ण मौलिक असे दस्तावेज तयार झालेले आहेत, त्यांची जेल डायरी, असे आज त्यांचे मोजके साहित्य उपलब्ध आहे, वास्तवात शहीद भगतसिंग यांनी चार पुस्तके लिहिलेली होती, जी तुरुंगातून त्यांनी बाहेर दिली होती, ती नष्ट केली गेली.
   शहिद भगतसिंग यांच्या साहित्याचा आणि त्यांनी भारताला कशा पद्धतीने स्वर्गाच्या कल्पनेसारखे सुंदर बनवता येईल याबाबत केलेली मांडणी आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की हा आपला भारत देश खरोखरच जागतिक पातळीवर एक महासत्ता बनवता येऊ शकतो, हा देश जगभरातील संपूर्ण देशांसाठी एक मॉडेल बनू शकतो.
एक गाजलेले वाक्य म्हणजे येथून गोऱ्या इंग्रजांचे राज्य जाऊन काळ्या लोकांचे राज्य यावे असा आमचा उद्देश नाही, हे भगतसिंग यांचेच वाक्य आहे, त्यांनी या देशातील राज्यकारभार करणारी व्यवस्था कशी असावी, याबाबत स्पष्ट लिहिलेले आहे. शहीद भगतसिंग यांनी धार्मिक दंगली आणि त्यावरील उपाय असाही एक लेख लिहिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी मांडलेले उपाय आणि आजची परिस्थिती याचा जर विचार केला तर आजही त्यांनी मांडलेले विचार तंतोतंत जुळतात. तसेच जातीयता आणि अस्पृश्यता याबाबतही त्यांनी अतिशय सडेतोड पणे आपले विचार मांडलेले आहेत, भगतसिंग यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही देशभक्तीची असल्यामुळे त्यांना ते बाळकडू मिळालेले होते, पण फारच लवकर आणि कमी वयामध्ये शहाद भगतसिंगांनी केलेले काम आज आपण अभ्यासल्यास आणि त्याप्रमाणे देशाचा विकास करण्याचा विचार केल्यास आपला देश समृद्ध होईल.
   त्यामुळे या देशातील प्रत्येकाने शहीद भगतसिंगांचे लिखाण अभ्यासले पाहिजे, भगतसिंग हे मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तक वाचत होते, अतिशय धामधुमीच्या परिस्थितीतही इंग्रज सरकारच्या विरूद्ध लढत होते, त्यांनी मांडलेले इंन्कलाब म्हणजे काय ? प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.
शहिद भगतसिंग म्हणतात "जेंव्हा एखादे सरकार, जनतेला आपल्या मुलभूत अधिकारापासून वंचित ठेवते, तेंव्हा त्या सरकारला नेस्तनाबूत करणे, तेथील युवकांचा अधिकारच नाही तर कर्तव्य बनते.म्हणून या देशातील प्रत्येक तरुणाने शहीद भगतसिंग यांचे साहित्य आणि त्यांचा जीवन प्रवास अभ्यासला पाहिजे, आजच्या जयंतीनिमित्त हीच त्यांना अभिवादन करण्याची खरी योग्य पद्धत असेल.
      
     ‌   प्रा. डॉ. संतोष वसंतराव रणखांब
        प्राणिशास्त्र विभाग प्रमुख,
     कै.  रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ जि.
      परभणी, 9404241492

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने