मित्रासाठी चोरी करतांना...
ही गोष्ट साधारणपणे 1983 - 84 ची आहे.मी सातारा येथील शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या मंगळवार पेठेतील धननीची बाग येथे असणा-या रा.ब.काळे जीवन शिक्षण विद्यामंदीर या शाळेत इयत्ता 7 वीत शिकत होतो.आणि तेथेच असणाऱ्या बोर्डिंगमध्ये राहत होतो.एक अनाथ म्हणून. महाराष्ट्रातील बहुजन समाजात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे महान कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले.त्यांनी सुरू केलेली 1919 मधील ही पहिली छत्रपती शाहू बोर्डिंग होय.
रयत शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी येण्याचा माझा प्रवास एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे आहे.तो सर्व येथे विशद करणार नाही.कधीतरी याविषयी सविस्तर लिहीन.अनेकांनी मला यावर आत्मकथा लिहण्यास सांगितले आहे.परंतू आजपर्यंत तरी आत्मकथनाला हात घातला नाही.मी सहावीची परिक्षा पास झाल्यानंतर 1984 ला सातवीत गेलो.वर्गातील सर्वात हुशार म्हणून सर माझे कौतुक करायचे.कब्डडी,किक्रेट, खोखो आदी खेळातही उत्कृष्ट खेळाडू होतो.एकदा एका क्रिकेटच्या मॅच मध्ये मी 9 विकेट घेतल्या होत्या.ही गोष्ट आमच्या बोर्डिंगचे अधिक्षक शिंदे सर यांच्या मिसेस व शाळेच्या शिक्षिका सौ.शिंदे मॅडम यांना कळाली तेंव्हा त्यांनी माझी आरती ओवाळून, साखर भरवून सत्कार केला होता.
सातवीचे शैक्षणिक वर्ष 1984 ला सुरू झाले.आणि दिवाळीच्या जवळच माझी पुढील शिक्षणासाठी शिंदे सरांनी
मुंबईत आल्यानंतर पहिलाचा दिवाळीचा सण जवळ आला होता.त्याकाळी दिवाळीत आकर्षक ग्रिटींग कार्ड बाजारात यायचे.मित्र, मैत्रीण, पाहुणे - रावळे एकमेकांना दिवाळीत ग्रिटींग कार्ड भेट देत असत.सातारा येथून मुंबईत आल्यावर मला माझ्या वर्ग मित्रांची खूप आठवण येत होती.त्यातच दिवाळी जवळ आलेली. मी फिरत फिरत चेंबूर रेल्वे स्टेशन जवळ गेलो.तेथे खूप मोठ मोठे ग्रिटींग कार्ड्चे दूकान होते.
रस्त्यावर उभा राहून एकसारखे एका दुकानातील कार्डकडे बघू लागलो.रंगीबेरंगी , आकर्षक ग्रिटींग कार्ड पाहून तेथून माझा पाय काही हलेना.खिशात तर रुपया नाही पण मित्रासाठी कार्ड घ्यायची इच्छा. दुकानात येणारे जाणारे लोक बघायचो तर कधी दुकान मालकाकडे पहायचो आणि तेथेच घुटमळायचो.मनात ठरवलं काही झालं तरी चालेल पण मित्रासाठी कार्ड न्यायचेच.
हळुच दूकानात शिरलो.एक एक कार्ड बघत, हातात घेत,पुन्हा जाग्यावर ठेवत दुकानात फिरु लागलो.मनात ठरवले दुकानदाराची नजर चुकवायची आणि कार्ड हळुच चोरायचे.पटकन शर्टात लपवायचे. कार्ड बघत, दुकानदाराकडे बघत पुढे पुढे सरकत असतांना एक कार्ड मला खूप आवडले.तेथे उभा राहिलो.कार्ड हातात घेतले आणि दुकानदाराकडे पाहिले.तो दुसऱ्या गिऱ्हाईकाला बोलत होता तेवढ्यात पटकन शर्टाखाली कार्ड लपवू लागलो.तोच दुकानदाराने मला पाहिले.तो रागानेच माझ्याकडे आला." साला चोरी करता है,चल तुझे पुलिस के हवाले करता हुं." मी रडकुंडीला आलो.त्याच्या हातापाया पडू लागलो. थरथर कापाया लागलो.
खुप विनवणी केल्यावर त्याने मला दुकानातून बाहेर हाकलले.मी सुटकेचा निःश्वास टाकला.पण खूप घाबरून गेलो होतो.दुकानदाराने आपणाला पोलिसांच्या हवाली केले असते तर काय झाले असते.पुन्हा माझ्या वस्तीगृहाच्या सरांना कळाल्यावर ते काय शिक्षा देतील.असे अनेक विचार मनात घोळू लागले.तर दुसरीकडं माझे साता-याचे मित्र डोळ्यासमोर दिसत होते.ज्यांच्यासाठी मी कार्डची चोरी करत होतो.
दुकानातून बाहेर पडल्यानंतर सरळ चेंबूरमधील माझ्या मंगल मंदीर होस्टेलकडे निघालो.पण चालत चालत अपराधी भावनेने मनात एक दृढ निश्चय केला आयुष्यात यापुढे अशी कोणतीही चोरी करायची नाही.कुणाचचं काही न विचारता घ्यायचं नाही.जेंव्हा मागे वळून या घटनेकडे पाहतो तेंव्हा मी जे केलं ती चोरीच होती हे लक्षात येते. पुन्हा आयुष्यात आजपर्यंत एकही चोरी केली नाही
आयुष्यातील दिवसा मागून दिवस निघून गेले.पुढे ज्या मित्रांसाठी मी ही चोरी करत होतो ते कुठे आहेत?कसे आहेत? याचा काहीच पत्ता नाही.पण जी मैत्री तेंव्हा ती त्यांच्यासाठी होती ती आजही मनात तशीच आहे.
रानबा गायकवाड
7020766674


टिप्पणी पोस्ट करा