डिजीटल युगात अंगत- पंगत संपली
कुटुंबातील एकत्र जेवण दुरावले आणि नाती विस्कटली!
परळी (धनंजय आरबुने-) पूर्वी कधीकाळी हो कधी काळीच घराघरांत एकत्र कुटुंबपद्धतीमुळे भारतीय बैठकीच्या जेवणाला कुटुंबातील लहान-मोठे सर्वच सदस्य हजर असायची आणि या जेवणाला विशेष महत्त्व होते. घरातील सगळे सदस्य जमिनीवर पंगत बसून जेवायचे. पदार्थांच्या चवीइतकेच गप्पागोष्टींचे, हास्यविनोदांचे आणि घरगुती स्नेहाचे जेवण होते. मात्र, काळाच्या ओघात ही संस्कृती लोप पावत आहे.तसे नातेसंबंधही दूरावत आहेत.
शहरांमध्ये जागेच्या अभावामुळे आणि जीवनशैलीतील बदलांमुळे बैठकीच्या जेवणाची जागा डायनिंग टेबलने घेतली. पण तिथेही कुटुंब एकत्र बसून संवाद साधेल, असे नाही. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आता घराघरात फक्त दोन-तीनच माणसे उरली आहेत. त्यामुळे पूर्वीसारखे गजबजलेली जेवणाची पंगत,आनंद देणार चवदार जेवणं, कुटुंबातील लहान मुलामुलींनी गजबजलेल स्वयंपाक घरं आता शांत आणि एकलकोंडे झाले आहे.
कुटुंब तुटली, पंगती झाल्या सुन्या
पूर्वी पाटावर, आसनावर मांडी घालून बैठ जेवण ही एक परंपरा होती. जमिनीवर पंगत बसायची, प्रेमाने आई, आज्जी, काकू जेवण वाढायचे, आग्रहाने अर्धी चतकोर पोळी अधिक जेवली जायची आणि गप्पांच्या गरमागरम फोडण्या जेवणाची चव वाढवायच्या. मात्र, आज तसं चित्र दुर्मिळ झालंय. एकत्र कुटुंबसंस्थेची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली कुटुंबात हम दो और हमारा एक याच पद्धतीने ताटातली नातीही विरळ झाली.
डायनिंग टेबलवरची शांतता आणि मोबाईलचा शिरकाव
शहरांमध्ये बैठकीच्या जेवणाची जागा डायनिंग टेबलने घेतली, पण तिथेही संवादाच्या जागी मोबाईल, टीव्ही आणि स्क्रीन यांनी प्रवेश केला. आज प्रत्येकाच्या हातात चमचा कमी आणि फोन अधिक दिसतो. आई वाढते, पण मुलांचे लक्ष स्क्रीनवर असते. बाबा काहीतरी सांगतात, पण मुलं चॅटिंगमध्ये व्यस्त असतात. "आज काय विशेष?" असा प्रश्न विचारायचाही कुणाला वेळ नसतो.
घरच्या चवींवर हॉटेलिंगचे वर्चस्व
आताच्या धावपळीच्या युगात घरी बसून एकत्र जेवण करणे कमी होत चालले आहे. विकेंडला घरगुती स्वयंपाकाऐवजी हॉटेल किंवा ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याकडे कल वाढलाय. हळूहळू आईच्या हातच्या स्वयंपाकाची जागा पार्सल डब्यांनी घेतली आणि कुटुंबाच्या जेवणातला आत्मीयतेचा स्वाद हरवला.
हरवलेल्या नात्यांचा शोध…
एकत्र जेवण ही केवळ शारीरिक भूक भागवण्याची गोष्ट नव्हती, तर ती मनांची भूकही भागवत होती. आज आपण पोटासाठी जेवतो, पण मनासाठी जेवतो का? पूर्वीच्या पंगतीत जे नाते होते, तो आपुलकीचा घास होता, ती प्रेमाची चव
होती. आज ती चव हरवत चालली आहे.
होती. आज ती चव हरवत चालली आहे.
कदाचित वेळ अजून गेलेली नाही! आजही आपण संधी घेऊ शकतो—काही काळ मोबाईल बाजूला ठेवून, कुटुंबासोबत निवांत जेवायला बसण्याची. संवादाची चव पुन्हा एकदा अनुभवण्याची नितांत आवश्यकता आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला कुटुंबातील सदस्यांनी एकत्र जेवणाची ही संस्कृती शिकवणार, की डिजीटल युगाच्या गर्दीत हरवून टाकणार? आता निर्णय आपल्या हातात आहे.


टिप्पणी पोस्ट करा