सामंजस्य करार,जी.डी.पी.वन ट्रीलिअन अर्थव्यवस्था परळीच्या भुमीपुत्राने परळीला नेले जागतिक पातळीवर तरुणांनो आपलं रोल मॉडेल बदला- उद्योजक भरत गित्ते_


सामंजस्य करार,जी.डी.पी.वन ट्रीलिअन अर्थव्यवस्था परळीच्या भुमीपुत्राने परळीला नेले जागतिक पातळीवर 

तरुणांनो आपलं रोल मॉडेल बदला- उद्योजक भरत गित्ते_

परळी वैजनाथ, (प्रतिनिधी.) 
           जगातील प्रत्येक देशाच्या विकासात चर्चा होत असते ती दोन देशांतील राष्ट्र प्रमुखांच्या सामंजस्य कराराची, परकीय गुंतवणूकीची, कोणत्याही देशाच्या जीडीपीची, आणि सर्वांत महत्त्वाचे वन ट्रीलिअन अर्थव्यवस्था म्हणजे काय हे सारे सर्वसामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे रुपयांच्या, डॉलरच्या  संबंधित शब्द सहजपणे समजावून सांगत परळीचे भुमीपुत्र आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त उद्योजक भरत गिते यांनी परळीकरांना जागतिक पातळीवर नेले.ते परळीकरांशी संवाद सांधतांना.याचवेळी त्यांनी तरुणांनो आपलं रोल मॉडेल बदला आणि आयुष्यात यशस्वी व्हा असे आवाहनही केले.
          तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. कंपनीचे एमडी तथा सीईओ आणि उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणाऱ्या उद्योजक भरत गित्ते या परळीच्या भूमीपुत्राचा परळीकरांच्या वतीने आज  (१६ फेब्रुवारी) सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर परळीत प्रथमच आगळीवेगळी प्रेरणादायक प्रकट मुलाखत परळीकरांनी अनुभवली. केवळ सन्मानच नाही तर थेट अन् ग्रेट अशी भरतभेट आगळ्यावेगळ्या या समारंभात झाली. तौरल इंडिया प्रायव्हेट.लि. या  कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक प्राप्त केलेल्या भरत गित्ते यांच्याशी परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिका
री व  साहित्यिक  प्रा.राजकुमार यल्लावाड यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवले. परळीचा भूमीपुत्र असलेल्या उद्योजक भरत गित्ते यांनी एका आंतरराष्ट्रीय कंपनीचा प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सामंजस्य करार केला. हा क्षण प्रत्येक परळीकरासाठी उर अभिमानाचा ठरला. परळीच्या मातीची खरी गुणशक्ती यानिमित्ताने अधोरेखित झाली. परळीच्या गुणशक्तीत अधिकाधिक वाढ व्हावी, अनेकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने हा समारंभ अविस्मरणीय, ग्रेट आणि प्रेरक ठरला.
           या समारंभात प्रारंभी उद्योग जगतात तळपणार्या या परळीच्या ताऱ्याचा समस्त परळीकरांच्या वतीने शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रा.पवन मुंडे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले.त्यानंतर परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व साहित्यिक  प्रा. डाॅ. राजकुमार यल्लावाड यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून भरत गित्ते यांच्याशी आत्मिय संवाद साधून सर्वांसाठी प्रेरक होईल अशा पैलूंना उलगडून दाखवणारी मुलाखत घेतली. बालपणापासून ते जर्मनीपर्यंतचा प्रवास, मायभूमीची ओढ ते सातासमुद्रापार कर्तव्य व कर्तृत्व, शेतकरीपुत्र ते ॲल्युमनियम मॅन पर्यंतची वाटचाल, स्टार्टअप ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त उद्योजक , नवोदितांसाठी कानमंत्र ते परळीसाठी उपयुक्त बाबी अशा विविध आणि चौफेर मुद्द्यांवर या मुलाखतीच्या माध्यमातून भरत गित्ते यांनी भाष्य केले.
         काहीसा भावूक, काहीसा मनमोकळा पण सर्वांना प्रेरक व दिशादर्शक ठरणारा हा संवाद ठरला.परळी या आपल्या मायभूमीत होत असलेल्या या सन्मानाने भरत गित्ते भारावून गेले होते.अतिशय सुक्ष्म नियोजन, समारंभाच्या स्वरुपाप्रमाणे अभिरुप व्यासपीठ यामुळे हा समारंभ भव्यदिव्य व अविस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी केले.कार्यक्रमास परळीतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, व्यापारी, पत्रकार, डाॅक्टर्स, सरस्वती शाळेचे आजी माजी शिक्षक, वर्गमित्र यांच्यासह सर्व स्तरातील परळीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने