पत्रकारांचे प्रश्न आन लोकांची हुशारी
परळी ( रानबा गायकवाड) विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे.परळी विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.मात्र खरी लढत कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यातच आहे.मात्र मतदार आपली भूमिका स्पष्ट न करता सावध व चतुराईने व्यक्त होतांना दिसत आहेत.
परळी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम इलेक्ट्रॉनिक व प्रिंट आणि डिजिटल मिडिया परळीत येऊन मतदारांना भेटत आहे.त्यांच्याशी चर्चा करून कुणाची हवा आहे आणि कोण 2024 विधानसभा निवडणुकीत बाजी मारणार आहे याविषयी जाणून घेत आहे.लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहे.
जेंव्हा एखादा पत्रकार अथवा टीव्ही चॅनल्सवाले नागरिकांना, विविध पक्षांच्या प्रतिनिधी अथवा नेते, कार्यकर्ते यांना एकत्रित करून मते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.मतदार संघात विकास झाला की नाही, मतदार संघाचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते केंव्हा सुटणार याविषयी विचारणा करतात तेंव्हा सहाजिकच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाची बाजू मांडतो सत्ताधारी त्यांची बाजू भक्कमपणे मांडतात तर विरोधी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल करतात.
पण खरी मजा येते सामान्य नागरिक आणि मतदारांशी बोलतांना.एक तर अनेक जण टीव्ही, लाईव्ह कॅमेरा पुढे येत नाहीत.नको बबा आपणाला या झंझटीत असे म्हणतात.तर जे समोर येतात तेही हुशारीने उत्तरे देतात.फाईट लय टाईट हाय,कोण निवडून येईल सांगता येत नाही, शेवटच्या दोन दिवसात वातावरण बदलू शकते.म्हणजे थेट कोणत्याही एका उमेदवाराची बाजू न घेता व्यक्त होत आहेत.शेवटी लोकशाहीत मतदान हा मतदाराचा अधिकार आहे.
टिप्पणी पोस्ट करा