परळीची जीवनवाहिनी मृत्यूचा सापळा बनला तरीही राजकीय पक्षांची उदासिनता नागरिकांचे अपघातात जाताहेत बळी, बोलणार कोण?

परळीची जीवनवाहिनी मृत्यूचा सापळा बनला तरीही राजकीय पक्षांची उदासिनता 

नागरिकांचे अपघातात जाताहेत बळी, बोलणार कोण?


परळी (रानबा गायकवाड)       परळी शहराची जीवनवाहिनी म्हणून पाहिले जात असलेला रेल्वे उड्डाणपुल हा मृत्यूचा सापळा बनला आहे.तरीही या अतिशय गंभीर अणि जनतेशी निगडित प्रशनांवर सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांची उदासिनता दिसून येत आहे.पूलावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन सर्वसामान्य नागरिकांचे अपघातात बळी जाण्याच्या घटना नेहमीच घडत असताना सुद्धा यावर कोण बोलणार असा सवाल निर्माण होत आहे. 
          याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे उड्डाणपूल हा परळी शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. परळी शहरातील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेंना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे पटरी वरून जाणारा रस्ता कायमचा बंद करण्यात आला व सर्व वाहतूक याच उड्डाणपूलावरून सध्या होत आहे. परळी कडून अंबाजोगाई मार्गे पुढे सर्व जिल्ह्यांना तर परळीतून याच उड्डाण पुलावरून बीड तसेच गंगाखेड मार्गे पुढे प्रवास करता येतो. 
      बाहेरगावाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांबरोबर शहरातील नागरिकांनाही या रेल्वे उड्डाण पुलाने जोडलेले आहे. शहरातील शिवाजीनगर, थर्मल कॉलनी, नागसेन न
गर, अशोक नगर, टीपीएस कॉलनी,दाऊतपुर ,टोकवाडी, संगम, वाघबेट,इंजेगाव ,नाथ्रा , नवीन थर्मल आदी गावासह तालुक्यातील बहुतेक ग्रामीण भागात याच मार्गे नागरिकांना ये जा करावी लागते. शहरातील न्यू  हायस्कूल, विद्यावर्धिनी विद्यालय,भेल सेकंडरी स्कूल, पोद्दार लर्निंग स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, रत्नाकर गुट्टे इंटरनॅशनल स्कूल, आदी महत्त्वाच्या शाळा आहेत. आणि दररोज हजारो विद्यार्थी याच पुलाचा वापर करून सदर शाळेत जातात.
      या उड्डाण पुलावर जागोजागी प्रचंड मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांचे अपघात होऊन निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. याच आठवड्यात खड्ड्यामुळे अपघात होऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण अपघात होऊन जखमी झालेले आहेत. या अतिशय महत्त्वाच्या आणि नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नावर मात्र सत्ताधारी असो किंवा कोणत्याही राजकीय पक्षाकडून आवाज उठवला जात नाही किंवा आंदोलन केलेले दिसून येत नाही. तसेच अवजड वाहने शहरातून येऊ नयेत म्हणून बायपास रोड बनवला आहे त्या मार्गाने अवजड वाहने गेली पाहिजेत याकडेही कोणी लक्ष देत नाही.
     शहरातील पत्रकारांनी अथवा सामाजिक कार्यकर्त्यांनी या विरोधात वर्तमानपत्रातून बातम्या दिल्या तर त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येतात. तसेच किमान शहराची ही जीवन वाहिनी असलेला उड्डाणपूल अपघात मुक्त व्हावा यासाठी पुलावरील खड्डे बुजवण्याकडे राज्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे अन्यथा अपघातांची ही मालिका अशीच पुढे चालू राहू शकते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने