रश्मीका मंदानावर कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, शेतकरी संघर्ष समितीचे आवाहन पिक विमा व इतर प्रश्नावर 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा

रश्मीका मंदानावर कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, शेतकरी संघर्ष समितीचे आवाहन

पिक विमा व इतर प्रश्नावर 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा

परळी प्रतिनिधी.     सिनेतारका रश्मीका मंदानावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 2018-  2019 या वर्षातील पिक विमा अद्याप मिळाला नाही तसेच सोयाबीनला हमीभाव नाही यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने परळी उपविभागीय कार्यालयावर दिनांक 23 सप्टेंबर रोजी भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीच्या संयोजकांनी परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली .


      शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने 23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य शेतकरी हक्क मोर्चाच्या संदर्भाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुदामातीताई गुट्टे ,काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख , किसान सभेचे बीड जिल्हाध्यक्ष अडवोकेट अजय बुरांडे,काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादुर भाई, वैद्यनाथ देवल कमिटीचे सदस्य राजेश देशमुख, शेतकरी नेते कालिदास आपेट, अंबाजोगाई भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते बाबा, शेतकरी किसान मोर्चाचे उत्तम माने, उद्योजक सुनील गुट्टे एडवोकेट माधव जाधव आदी शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
     यावेळी उपस्थित शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, बीड जिल्ह्याला 2018 पासून चा पिक विमा मिळालेला नाही. बीड जिल्ह्याच्या शेजारी असणारे परभणी, धाराशिव, लातूर आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला आहे. परंतु महाराष्ट्राचे कृषिमंत्री असलेल्या नामदार धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकर्यांचा सन 2018-  2019-  20 चा पिक विमा तसेच सोयाबीन खरीप पिक विमा, गुलाबी बोंड आळी नुकसान भरपाई आदीपासून वंचित आहे.
     तसेच कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे अनुदान द्यावे मगच मत मागायला यावे. केवळ वेगवेगळ्या अनुदानाच्या घोषणा केल्या जातात मात्र शेतकऱ्यांच्या हातात भोपळा दिला जात आहे. सरकारमध्ये धनंजय मुंडे यांचे काही चालत नाही. त्यामुळेच की काय बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्याचे म्हटले आहे.
     बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत .अनेक आत्महत्यांची प्रशासन नोंद सुद्धा घेत नाही असा आरोप करीत रश्मी मंदानाला बोलावून तिच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत असे आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी केले.
     23 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य अशा ट्रॅक्टर, बैलगाडी शेतकरी हक्क मोर्चात परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई येथील साखर कारखाना तसेच पनगेश्वर शुगर मिल परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने