लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे शिक्षण झालेली जिल्हा परिषद शाळा बनली धोकादायक
चित्रकला परीक्षेचे केंद्र स्थलांतरित करण्याची मागणी
परळी प्रतिनिधी. दिवंगत लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी आपले माध्यमिक शिक्षण घेतलेले परळी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आज अत्यंत धोकादायक अवस्थेत आली आहे. त्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवितास धोका असून नवीन अद्यावत इमारत बांधून द्यावी अशी मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच सप्टेंबर मध्ये होणाऱ्या चित्रकला परीक्षा केंद्र रद्द करून दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी ही होत आहे.
परळी शहरातील ऐतिहासिक अशी वास्तू पैकी एक असलेली जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे बांधकाम निजाम काळामध्ये 1935 ला पूर्ण झाले व त्याच वर्षी शाळा सुरू झाली. या बिल्डिंगला 89 वर्ष झाले आहेत. शाळेच्या छताला मोठे मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी छताला सपोर्ट दिलेले जुने लाकडी खांब निघून पडत आहेत. तसेच खिडक्या दरवाजे मोडके झाले आहेत.
दिवंगत लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी आपले माध्यमिक शिक्षण या शाळेतून पूर्ण केले होते. जिल्हा परिषद शाळेने परळीच्या वैभवात भर घातलेली आहे. अनेक डॉक्टर, प्राध्यापक, वकील, विचारवंत व्यवसायिक या शाळेने परळीला दिलेले आहेत. त्यामुळे या शाळेला विशेष असे महत्त्व आहे .
नवीन वर्ग उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गटशिक्षणाधिकारी ,शिक्षणाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही कुठलेही शाळेचे काम झाले नाही.येत्या 15 सप्टेंबर रोजी चित्रकला परीक्षेचे सेंटर या ठिकाणी देण्यात आले आहे. नवीन ज्या वर्ग खोल्या बांधण्यात आले आहेत त्यापैकी सध्या सहा वर्ग खोल्यांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाचे 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत .त्यामुळे चित्रकला परीक्षेस येणारे 800 ते 1000 विद्यार्थी कसे आणि कोठे बसवायचे हा प्रश्न आहे. जुन्या इमारतीत कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा नाहीत. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय होईल अशा ठिकाणी सेंटर देण्यात यावे अशी मागणी पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा